तरुण भारत लाईव्ह । २० मे २०२३। वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळवण्यासाठी जळगाव परिमंडलातील 90 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.
जळगाव परिमंडलातील 16 लाख 31 हजार 619 वीजग्राहकांपैकी 14 लाख 78 हजार 480 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील 12 लाख 62 हजार 735 ग्राहकांपैकी 11 लाख 30 हजार 407 ग्राहकांचा तर कृषिपंप वर्गवारीतील 3 लाख 68 हजार 884 ग्राहकांपैकी 3 लाख 48 हजार 73 ग्राहकांचा समावेश आहे. जळगाव मंडलात 9 लाख 77 हजार 74 वीजग्राहकांपैकी 9 लाख 6 हजार 446 ग्राहकांनी, धुळे मंडलात 4 लाख 37 हजार 227 वीजग्राहकांपैकी 3 लाख 96 हजार 462 ग्राहकांनी, तर नंदुरबार मंडलात 2 लाख 17 हजार 318 वीजग्राहकांपैकी 1 लाख 75 हजार 572 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे.
या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येत आहे. परिमंडलातील 90 टक्के घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा अशा ग्राहकांनी 24 तास सुरू असणाऱ्या 1912 किंवा 1800-212-3435 व 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर, https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अॅपवर नोंदणी करावी. वीजबिलाचा तपशील व इतर माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांनी आपले क्रमांक वरील पद्धतीने नोंदवण्याचे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.