उर्फी… चाकणकरांना पदावर राहण्याचा अधिकार नाही – चित्रा वाघ

मुंबईः उर्फी जावेदच्या मुद्द्यावरून समाज स्वास्थ्यासाठी एकत्र आले पाहिजे असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. वाघ यांनी थेट महिला आयोगाला लक्ष्य करीत रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही यासाठी मी बोलले, तिला माझा विरोध नाही तिच्या विकृतीला माझा विरोध आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या आहे. तसेच उर्फी जावेद प्रकरणामध्ये महिला आयोगाने सुमोटे केस चालवणं गरजेचं होतं. परंतु महिला आयोगाने उर्फीला सॉफ्ट कॉर्नर दिल्याचं वाघ म्हणाल्या.

” मुंबईत महिला उघडीनागडी फिरत असताना प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली नाही, हे दुर्दैवी आहे. अश्लील, घाणेरडे, ओंगळवाणे व्हीडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत असताना दुर्लक्ष केलं गेलं.

चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या दुटप्पीपणाचा पुरावाच यावेळी सादर केला. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाने ट्विटरवच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवल्याचं वाघ यांनी सांगितलं.

या पोस्टरमुळे समाजात धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन, असा चुकीचा संदेश जात असल्याने जनमाणूस आणि समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असल्याचं आयोगाने नमूद केलं होतं.

मात्र इथे उर्फी जावेद रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोगाला काहीच कसं वाटत नाही? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित करुन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.