---Advertisement---
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या खासदारांनी वार्षिक सरंक्षण धोरण विधेयक सादर केले असून, त्यात क्वाडच्या माध्यमातून भारतासोबत सहकार्य वाढवण्याची मागणी करण्यात आली. चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आणि मुक्त व स्वतंत्र भारत-प्रशांत क्षेत्रासाठी हे आवश्यक असल्याचे अमेरिकी खासदारांनी या विधेयकात म्हटले आहे.
२०२६ या आर्थिक वर्षासाठी खासदारांनी रविवारी ‘नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ॲक्ट’ विधेयक सादर केले. यात भारत-प्रशांत क्षेत्रात संरक्षण आघाडी आणि भागीदारीत काँग्रेसचे मत सांगण्यात आले आहे. भारत-प्रशांत क्षेत्रात अमेरिकेचे सरंक्षण आघाडी आणि भागीदारी बळकट करण्याचे प्रयत्न सुरू ठेवावे, असे यात अमेरिकी संरक्षण मंत्र्यांना सांगण्यात आले आहे. चीनसोबतच्या धोरणात्मक स्पर्धेत अमेरिकेचा तुलनात्मक फायदा वाढवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे विधेयकात म्हटले आहे.
या प्रयत्नांत क्वाडच्या माध्यमातून अमेरिकी सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नाचा समावेश आहे. द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय सहयोग, सैन्याचा युद्धाभ्यास, संरक्षण व्यापार वाढवणे आणि मानवी मदतीसाठी तसेच संकटकालीन मदतीचा यात समावेश आहे. एक स्वतंत्र आणि मुक्त भारत-प्रशांतक्षेत्र तयार करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे विधेयकात म्हटले आहे.
भारतासोबत सामुद्री सुरक्षेवर सहकार्य अधिक वाढवण्यात यावे, यावरही जोर देण्यात आला आहे. क्वाडमध्ये भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. चीनच्या आक्रमकतेचा सामना करण्यासाठी २०१७ मध्ये क्वाडची स्थापना करण्यात आली आहे.









