नांदेड : मानवी मूत्रापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या संशोधनाला अमेरिकन पेटंट मिळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम सखाराम माने व डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने हा शोध लावला. मानवी मूत्रामध्ये असलेला कार्बन हा ऊर्जानिर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतो हे त्यांनी या संशोधनातून सिद्ध केले. मानवी मूत्राचा वापर करून कार्बन पदार्थाची निर्मिती केली जाणार आहे आणि या पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. मानेंनी कोरियाच्या हॅनयांग विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेट फेलो म्हणून काम केले.
या संशोधनामध्ये मानवी मूत्रातून कार्बन नॅनो मटेरियल तयार करुन त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी कसा केला जाऊ शकतो हे स्पष्ट करण्यात आले आहे. या शोधाच्या माध्यमातून प्रा. डॉ. राजाराम माने व डॉ. झोयेक शेख यांनी तयार केलेल्या कार्बन नॅनो मटेरियलचा वापर हा हायड्रोजन निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. याचा उपयोग इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ऊर्जा क्षेत्राला यातून हातभार लागणार.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील या संशोधकांचे पुढील संशोधन हे बोअरवेलच्या पाण्यातून मेटल हॅलाइड वेगळे करण्याच्या पद्धतीवर सुरु आहे. त्याचाही उपयोग पुढे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मितीसाठी होणार आहे. मानवी मूत्र एकत्र करण्यासाठी महानगरपालिका, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्याशी करार करण्यात येणार आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मितीसाठी मदत होणार आहे.