मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात् एआयचा वापर रस्ता सुरक्षेसाठी करण्यावर भर द्यावा. यासाठी गुगलसोबत करार झाला असल्याने त्याचा प्रभावी वापर करण्यात याला, असा निर्देश सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत त्यांनी आज परिवहन विभागाचा आढावा घेतला.
राज्यातील परिवहन क्षेत्र सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील तीन वर्षात नवीन ईव्ही धोरण घोषित करण्यासोबतच १५ वर्षे झालेली वाहने भंगारात काढावी, रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी एआयचा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, असा निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिला.
वडसा गडचिरोली तसेच सोलापूर- उस्मानाबाद येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. राज्य परिवहन सेवेच्या १५ वर्षे झालेल्या बसेस भंगारात टाकून उर्वरित बसेसमध्ये एलएनजी तसेच सीएनजी किट बसविण्यात यावी, जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. या बैठकीत पुढील १०० दिवसांचा आढावाही घेण्यात आला.