महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एआयचा उपयोग करणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा सोडवणे याकरिता मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही एका प्रकल्पावर काम करत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग कसा करता येईल, यासाठी आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून एक प्रकल्प तयार करत होतो. नागपूर येथील इंडियन इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट यांच्यासोबत हा प्रकल्प तयार करण्यात आला असून यात सरकारची एक कंपनी तयार करण्यात आली आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे.”

“कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच एखादा गुन्हा घडला असल्यास तो सोडवण्याकरिता पूर्णपणे याचा वापर करता येणार आहे. यासंदर्भात आज प्रमुख अधिकाऱ्यांसमोर तयार करण्यात आलेल्या मॉड्युलचे प्रेझेंटेशन झाले आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांवर काम करुन लवकरच हा प्रकल्प बाहेर आणला जाणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “कायदा आणि सुव्यवस्था क्षेत्र, गुन्हेगार आणि सीसीटीव्ही कॅमेराचं विश्लेषण करणे, सायबर गुन्हे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये याचा उपयोग होणार आहे. मोठ्या प्रमाणात गुन्हे सोडवणे, ट्राफिक मॅनेजमेंट या सगळ्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होणार आहे. देशातील सर्वात आधुनिक सायबर डिटेक्शन सेंटर आपण सुरु केलेलं असून ते लवकरच सुरु होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एआयचा मोठा उपयोग होणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

दोन समाजांत तेढ निर्माण होऊ नये!

ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले की, “कुठेही दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि कोणत्याही समाजाचं अहित होऊ नये, एवढाच आमचा प्रयत्न आहे. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे. सगळ्यांचे प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवायचा आहे आणि तसाच आमचा प्रयत्न राहणार आहे,” असे ते म्हणाले.