---Advertisement---
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने अतिरेक्यांची नाकेबंदी केल्यानंतर आता पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने हेरगिरीसाठी नेपाळी नागरिकांचा वापर करणे सुरू केल्याचे समोर आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मार्गे भारतात आलेल्या आणि आयएसआयसाठी काम करणाऱ्या नेपाळी नागरिकाला अटक केली. अन्सारुल मियां अन्सारीला असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून भारतीय सैन्याची गोपनीय कागदपत्रे, तैनाती योजना आणि प्रशिक्षण नियमावली जप्त केली. ही सगळे कागदपत्रे तो पाकिस्तानला पाठवणार होता. चौकशीदरम्यान, अन्सारीने कबूल केले की, तो पाकिस्तानी एजंट यासीरच्या सुचनेवर हे काम करत होता. याशिवाय समाज माध्यम आणि मेसेजद्वारे तो पाकिस्तानी एजंटशी संवाद साधत होता.
अटक करण्यापूर्वी त्याने संवेदनशील माहिती असलेली सीडी तोडली होती. तपासात असेही समोर आले आहे की, अन्सारीचे भारतात अनेक सहकारी आहेत, ज्यामध्ये झारखंडच्या अखलाक आझमचे नावदेखील आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, एक नेपाळी नागरिक गोरखपूर मार्गे भारतात आल्याची आणि त्याच्याकडे भारतीय सैन्याशी संबंधित गोपनीय कागदपत्रे असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
दिल्लीत पाकिस्तानी एजंट्सला भेटला
आरोपीकडून एक लॅपटॉप, प्रिंटर आणि गोपनीय माहिती असलेली कागदपत्रे, तसेच १९८२ मध्ये छापलेले फायटिंग इन बिल्ट अप एरियाज शीर्षक असलेले एक पत्रक जप्त करण्यात आले. अन्सारीने कबूल केले की तो नेपाळमार्गे भारतात यायचा आणि दिल्लीतील पाकिस्तानी एजंट्ससोबत भेट घेत असे. त्याच्या मोबाईलमधून जप्त केलेले व्हॉट्सअॅप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि पाकिस्तानी नंबरची चौकशी केली जात आहे.