उतावळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची रणनीती !

उद्धव ठाकरे यांची अवस्था सध्या केविलवाणी आहे. तिरकस बोलायचं, टोमणे हाणायचे, समोरच्याची टिंगल उडवायची हा उद्धव ठाकरे यांचा मूळ स्वभाव आहे. हातचे सारे गेल्यानंतरही त्यांना तो बदलता आला नाही. आमदार सोडून गेले, पक्ष हातून गेला, हातातली सत्ता गेली, नको त्यांच्यासोबत बसायची वेळ आली तरी त्यांची खोड जायला तयार नाही. खुद्द शरद पवार यांनी आपल्या सुधारित आत्मचरित्रात उद्धव यांचे कान उपटले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या अडीच वर्षांत उद्धव फक्त दोन दिवस मंत्रालयात आले.

घरी बसून होते असे पवारांनी लिहून ठेवले आहे. उद्धव ठाकरेंना यात आपली चूक झाली, असे वाटत नाही. मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला, असे ते म्हणतात. आता त्यांनी तो कसा सांभाळला ते महाराष्ट्राने भोगले. त्यांच्याच आमदारांनी त्यांना फेकून दिले. तरीही उद्धव यांची अजून पुरती जिरलेली दिसत नाही. बंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झाले. मात्र, पवार ते कसे हाताळताहेत आणि उद्धव ठाकरेंनी कसे हाताळले? शिवसेनेत बंड होताच ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली.अजितदादांच्या बंडानंतर शरद पवारही तशी मागणी करू शकले असते. ठाकरे यांच्यासारखा उतावीळपणा शरद पवारांनी केला नाही. अजित पवारांसह ९ जण महायुतीत मंत्री झाले. शरद पवार गटाचे तब्बल ३५ आमदार अजितदादाच्या मागे गेले. या बंडाला एक महिना उलटला.

तरीही राष्ट्रवादीत फूट नाही.असेच शरद पवार गटाचे वागणे आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शरद पवार गटाची कुठलीही लेखी तक्रार नाही. काका नव्याने पक्ष उभा करतो म्हणतात. पण पुतण्याच्या विरुद्ध कायद्याचे हत्यार का उपसत नाहीत? शेवटी पवारांच्या मनात काय? काय रणनीती? २०२४ च्या निवडणुकीत शरद पवारांना भाजपला मदत करायची आहे का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नुकतेच उद्धव जे बोलले त्याबद्दल त्यांचा संताप तर येतोच; पण कीवही येते, दया येते. देवेंद्र यांना त्यांनी मस्टर मंत्री म्हटलं. मस्टर म्हणजे हजेरी पुस्तक. शाळेत, कार्यालयात हजेरीची नोंद ठेवण्यासाठी हजेरी पुस्तक असते. हजेरी पुस्तकाचे महत्त्व कळत नसल्याने उद्धव सत्तेबाहेर फेकले गेले.

आमदार सांभाळावे लागतात हेच उद्धव यांना ठाऊक नव्हते. पित्याचा पक्ष म्हणजे आपली इस्टेट आहे अशाच थाटात उद्धव वागले.त्याची अद्दल त्यांना घडली. मात्र, त्यापासून धडा घ्यायला ते तयार नाहीत. उलट ‘देवेंद्रवर मस्टर सांभाळण्याची वेळ आली’ असा टोमणा त्यांनी हाणला. मात्र, देवेंद्र हे मस्टर नव्हे तर मास्टरब्लास्टर मंत्री आहेत, हे ते सोयीस्कररीत्या विसरतात. अंगी काही कर्तृत्व असेल तर टीका-टोमण्यालाही धार येते. मात्र, हाती काही नाही; नुसती व्यर्थ बडबड! त्यांचेच लोक वैतागले आहेत. म्हणूनच गळती थांबायचे नाव घेत नाही. तुम्ही लिहून ठेवा; २०२४ ची निवडणूक लागेल तेव्हा ठाकरे यांचा तंबू रिकामा झालेला असेल.

दोघे-चौघे उरतील. म्हणजे माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी; आणि म्हणून उद्धव ज्या प्रकारची भाषा बोलतात तो सारा केविलवाणा प्रकार होतो. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. अडीच वर्षे विरोधी बाकांवर असतानाही फडणवीसांनी १०५ आमदार टिकवून ठेवले. एकही फुटला नाही. सध्याच्या अस्थिर राजकारणात ही कामगिरी मोठी आहे. स्वतःचे आमदार तर सांभाळलेच; पण शिवसेना फुटून आलेल्या ५० आमदारांनीही देवेंद्र यांचे विश्वासार्ह नेतृत्व स्वीकारले. शरद पवारांची माणसं फुटणे सोपे नसते. मात्र, शरद पवारांचाच पुतण्या ३५ आमदार घेऊन महायुतीच्या छावणीत दाखल झाला. थोडे थोडके नव्हे तर या वर्षभरात एकूण ८०-८५ आमदार भाजपच्या सोबतीला आले. अलिकडच्या काळात झालेले हे सर्वात मोठे ऑपरेशन आहे. या सर्वांचा लोहचुंबक देवेंद्र फडणवीस आहे.

आमदारांचा विश्वास आणि मोदी-शाह हायकमांडचा आशीर्वाद या जोरावर देवेंद्र ही जादू करू शकले. २०२४ मध्ये तुम्हाला बरेच काही भूकंप पाहायला मिळतील. राहिला प्रश्न देवेंद्र यांचा. देवेंद्र टोमणे मारत नाहीत. त्यांचे काम बोलते. गेल्या दोन निवडणुका जनता देशाची सत्ता एकहाती नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवत आहे. तुम्ही लिहून ठेवा. शरद पवारही पुढेमागे भाजपसोबत येतील. पवारांचे राजकारण ‘जिधर बम, उधर हम’ असेच राहिले आहे. सोनिया गांधी नको म्हणून पवारांनी राष्ट्रवादीचे दुकान लावले. मात्र पुढे सोनियांच्याच छत्रछायेतल्या सरकारमध्ये पवार तब्बल १० वर्षे मंत्री होते. सत्ताकेंद्रित राजकारण फार टिकत नसते. देवेंद्र यांचे राजकारण कामाने बोलते. त्यागाने बोलते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन मोठा त्याग केला. आता अजित पवार यांना स्वतःकडचे अर्थ खाते दिले. ममता, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल ही नकली नाणी आहेत. उद्धव आता तर मुंबई महापालिकेचेही नेते राहणार नाहीत.

असंगाशी संग करून त्यांनी आपले दिवाळे काढले. राहुल गांधी अजूनही अपरिपक्व नेते आहेत. भारत जोडो यात्रा काढून देश जिंकता येत नसतो. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या चक्रव्यूहात अडकून त्यांनी मोठी चूक केली. काँग्रेस स्वबळावर लढली असती तर लोकसभेत विरोधी नेत्याचे पद मिळविण्याएवढ्या जागा तरी मिळाल्या असत्या. आता इंडियाच्या जागा वाटपात भयंकर हाणामारी होणार आहे. त्यात काँग्रेसची अवस्था २०१९ पेक्षा खराब होणार आहे. सुप्रीम कोर्टाने खासदारकी बहाल केल्यानंतर संसदेत राहुल गांधींचे स्वागत करायला इंडियाचे सारे नेते पुढे आले होते. मात्र, ज्या दिवशी राहुल स्वतःला इंडियाचे स्वघोषित नेते समजू लागतील त्या दिवशी इंडियात घटस्फोटाच्या नोटिसा निघू लागतील. वाचाळवीरांना जवळ करायचे की काम करणा-यांना? २०२४ मध्ये लोकांना निर्णय करायचा आहे.