Uttar Pradesh : BSP ला सोडचिठ्ठी देत, रितेश पांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश.

Ritesh Pandey : मायावतींच्या नेतृत्वाखालील बसपाला लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर मतदारसंघातील लोकसभा खासदार रितेश पांडे यांनी रविवारी (25 फेब्रुवारी) बहुजन समाज पक्षाचा (BSP) राजीनामा दिला आहे. त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडेच ते संसदेच्या कॅन्टीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जेवण करताना दिसले होते. त्यांनी मायावतींना पत्र लिहून म्हटले आहे की, दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रितेश पांडेने रविवारी दुपारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून ते बसपा सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रितेश पांडे काय म्हणाले?
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बसपा खासदार रितेश पांडे म्हणाले की, मी गेल्या 15 वर्षांपासून बसपासोबत काम करत आहे. मला मायावती आणि उपक्रमांवर भाष्य करायचे नाही. मी माझ्या राजीनामा पत्रात याबद्दल सविस्तर लिहिले आहे.