पाचोरा : पाचोऱ्यात भूखंडाचा बाजार, कमिशन, टक्केवारी व दहशतीचे वातावरण; एकीकडे गद्दारी करायची आणि तात्यांचा फोटो वापरायचा. तात्या हे निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यामुळे गद्दारांनी या पुढे माझ्या वडिलांचा फोटो वापरू नये, असा इशारा शिवसेना (उबाठा) नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता दिला.
येथे खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. निष्ठांवंत शिवसैनिकाच्या हातातील मशाल ही येणाऱ्या विधानसभेत गद्दारीचे पाप जळणार आहे. पाचोरा-भडगाव मतदार संघात तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यांच्या नेतृत्वखाली निष्ठावंतांची मोठी फौज उभी राहिली आणि खेडोपाडी गल्ली बोळात शिवसेनेचे जाळे विणून काढलं. आमच्या घरात दोन वेळा आमदारकी दिली. शिवसेनेने एवढं सर्व देऊन सुद्धा संघटनेशी बेईमानी कशासाठी ? असा सवालही उपस्थित केला.
साहेब राहिले असते तर त्यांनी हा गद्दारीचा प्रकार सहन केला नसता. म्हणून मी तात्यांचा वारसा चालविण्यासाठी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश करत राजकारणात सक्रिय झाले. काही लोक माझ्यावर टीका करतात की, ताई राजकारणात नवखी आहे. ताईला राजकारणातलं काही कळत नाही. ताईला राजकारणातला अनुभव नाही. पण मी आपल्याला सांगते ते जर माझ्यावर असं टीका करत असतील त्यात काही अंशी सत्यता आहे. कारण मला भ्रष्टाचाराचा, टक्केवारीचा, गद्दारीचा, लाचारीचा अनुभव नाही असेही त्या म्हणाल्या.
मी तात्या साहेबांची मुलगी आहे. मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हे सगळे यशस्वी करून दाखवणारच आहे. हे गुण माझ्या जन्मजात आहे. कष्ट करण्याची आणि मेहनत करण्याची माझी प्रवृत्ती आहे. नवीन शिकण्याची माझी प्रवृत्ती आहे.त्यामुळे मी हे करून दाखवणारच आहे अशी ग्वाही दिली.
या पाचोरा भडगाव मतदार संघाच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून उद्धव साहेबांनी विधानसभेत पाठवण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली आहे मला असं वाटतं हा मतदारसंघातील नारी शक्तीचा सन्मान असल्याचे त्या म्हणाल्या.