---Advertisement---
नवी दिल्ली : वंदे भारत गाड्यांमध्ये लवकरच स्थानिक व्यंजन प्रवाशांना दिले जाणार आहेत. याशिवाय अनेक नवीन सुविधाही देण्याची तरतूद रेल्वे मंत्रालयाने केली असल्याने वंदे भारतचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच रेल्वे भवन येथे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रखनीतसिंग बिट्ट देखील उपस्थित होते. या बैठकीत प्रवाशांची सोय वाढवणे आणि तिकीट बुकिंग प्रणाली सुधारणे यावर भर देण्यात आला. मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना वंदे भारत गाड्यांमध्ये प्रादेशिक जेवण देण्याचा निर्देश दिला, जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान त्या प्रदेशाची संस्कृती आणि चव अनुभवता येईल. या वैशिष्ट्यामुळे प्रवाशांच्या प्रवासात लक्षणीय सुधारणा होईल आणि भविष्यात सर्व गाड्यांमध्ये त्याचा अवलंब केला जाईल.
या बैठकीत बनावट ओळखपत्रांचा वापर करून रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय रेल्वेने केलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात आला. वैष्णव म्हणाले की बनावट वापरकर्ता आयडी शोधण्यासाठी आणि वापरकर्ता ओळखपत्र पडताळण्यासाठी एक कठोर प्रणाली लागू करण्यात आली आहे, ज्याचे सकारात्मक परिणाम मिळत आहेत.
सुधारणांपूर्वी, आयआरसीटीसी संकेतस्थळावर दररोज अंदाजे एक लाख नवीन वापरकर्ता आयडी तयार केले जात होते, जे आता फक्त ५,००० पर्यंत कमी झाले आहे. या कारवाईद्वारे, भारतीय रेल्वेने आतापर्यंत तीन कोटी बनावट खाती निष्क्रिय केली आहेत.
२ कोटी ७० लाख आयडी निलंबित
याव्यतिरिक्त, संशयास्पद क्रियाकलापांच्या आधारे २ कोटी ७० लाख इतर वापरकर्ता आयडी तात्पुरते निलंबित केले आहेत किंवा निलंबित करण्यासाठी चिन्हांकित केले आहेत. केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तिकीट प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करण्याचा स्पष्ट निर्देश दिला. यामुळे दलाल आणि फसव्या बुकिंगला पूर्णपणे आळा बसेल आणि सामान्य प्रवाशांना दिलासा – मिळेल. रेल्वे प्रवास अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर बनवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.









