Varangaon Crime News : ऑर्डनन्स फॅक्टरीतील सुपरवायझरची भावाने केली हत्या

भुसावळ :  वरणगाव ऑर्डनन्समध्ये सुपरवायझर पदावर असलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीची सख्ख्या भावानेच प्लॉट विक्रीच्या वादातन डोक्यात बॅट टाकून हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली. प्रदीप जयसिंग इंगळे (४८) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, हा खून मयताचा सख्खा भाऊ व वरणगाव ऑर्डनन्स मधील काडतूस चोरी प्रकरणातील संशयित सतीश जयसिंग इंगळे यांनी केल्याने त्यांना अटक करण्यात आली.

आर्थिक वादातून केली हत्या
वरणगाव आयुध निर्माणीच्या वसाहतीत क्वार्टर क्रमांक ४४ टाईप श्रीमध्ये प्रदीप जयसिंग इंगळे हे वास्तव्यास होते व वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर पदावर नोकरीवर होते.  बुधवारी ते ड्युटीवर गेले व दुपारी ते जेवणासाठी घरी आल्यानंतर भाऊ सतीश इंगळे यांच्यासोबत वाद झाला. यावेळी लाकडी बॅट डोक्यात मारल्याने व घाव वर्मी बसल्याने प्रदीप इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

प्लॉटच्या वादातून भावाची हत्या
समजलेल्या माहितीनुसार, तुकाराम नगरात तीन हजार चारशे स्वेअर फूट प्लॉट सतीश इंगळे यांनी घेतला होता व त्यातील एक हजार प्लॉट मयत प्रदीप इंगळे यांच्यासाठी घेण्यात आला व त्यासाठी साडेपाच लाख रुपये सतीश यांनी त्यावेळी दिले होते व ते परत मागण्यावरून बुधवारी दोघा भावांमध्ये वाद झाला व त्यातून ही हत्या झात्याचा पोलिसांचा कयास आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची धाव
खुनाची माहिती कळताच भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, वरणगावचे सहायक निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गांगुर्डे, उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हवालदार संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी आदींनी धाव घेतली.

या आधीही चोरीचा गुन्हा
खून प्रकरणातील आरोपी तथा वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील गुणवत्ता आश्वासक विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश जयसिंग इंगळे यास एके- ४७ रायफलीत वापरलेले जाणारे पाच जिवंत काडतूस चोरताना सतर्क सुरक्षा रक्षकांनी अटक २६ जून २०२४ रोजी पकडले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती.