Varangaon Crime News : दुचाकी चोरट्यास अटक; ४ दुचाकी केल्या हस्तगत

वरणगाव : नवीन मोटारसायकलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे. या किमती परवडत नसल्याने अनेकांचा कल नवी ऐवजी कमी किमतीत सेकेंड हँन्ड मोटारसायकल घेण्याकडे वाढला आहे. परंतु, अशी मोटरसायकल घेताना संबंधितांकडून कागदपत्रांची खातरजमा करुन घेणे गरजेचे बनले आहे. अन्यथा, तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. कारण स्थानिक गुन्हे शाखेने नुकताच दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. त्याच्याकडून चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे  जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गोपनीय माहिती काढून पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमी मिळाली की, वरणगाव येथील जाबीर शहा भिकन शहा हा त्याचे साथीदार सह मोटार सायकल चोरी करून त्या कमी पैश्यामध्ये विक्री करीत आहे. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफो विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी यांचे पथक तयार करून तात्काळ जावीर शहा याला ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. मध्यप्रदेश, मलकापूर आणि मुक्ताईनगर या पोलीस स्टेशनमध्ये या मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पथक साधारण ३ दिवसापासून जाबीर शहा याच्यावर पाळत ठेवून होते. पथकाने २८ रोजी वरणगाव शहरातील तिरंगा चौकातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार मोटर सायकल ज्यांची किंमत १ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे त्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मुक्ताईनगर मलकापूर मध्य प्रदेश मधील खकनार या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहे. मुक्ताईनगर पो.स्टे सी सी टी एन एस गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क. ३७९ या गुन्ह्यात मुक्ताईनगर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.