---Advertisement---
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेने शहरातील मालमत्ता धारकांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यानुसार ‘शास्ती माफी अभय योजना’ लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ही योजना १९ मे २०२५ पासून लागू करण्यात आली असून, मालमत्ता कराची थकबाकी भरताना लागणारी शास्ती पूर्णतः किंवा अंशतः माफ करण्याची ही संधी आहे.
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात अनेक मिळकत धारक आर्थिक अडचणीमुळे मालमत्ता कर वेळेवर भरू शकत नाहीत. परिणामी, थकबाकीवर दरमहा २ टक्के शास्ती आकारली जाते. ही शास्ती रक्कम वाढत जाऊन मिळकतधारकांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून शासनाने ही अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही योजना एकदाच लागू करण्यात येणार आहे. दि. १९ मे पर्यंतच्या थकित करावरील शास्तीस ही योजना लागू राहील. फक्त शास्ती माफीचा लाभ मिळेल; मूळ थकित कराची रक्कम संपूर्ण भरावी लागेल. पूर्ण कर भरल्यानंतरच शास्ती सवलतीचा प्रस्ताव विचारार्थ मंजुरीसाठी पाठवला जाईल.
शास्ती सवलतीसाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दि. १९ मे नंतरची थकबाकी या योजनेत समाविष्ट होणार नाही. प्रस्ताव सादर करताना आधारकार्ड, मागणी बिलाची व कर भरण्याची पावती संलग्न करावी. वरणगाव नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकत धारकांना दि. ३१ ऑगस्टपर्यंत ही संधी उपलब्ध असून, त्यांनी तात्काळ थकित कराची रक्कम भरून, शास्ती माफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.