अतिक्रमण विभाग कर्मचार्‍यांची वाणवा , अधिकारी, पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष

जळगाव : महानगरपालिकेंतर्गत असलेला अतिक्रमण विभाग कर्मचार्‍यांची वाणवा जाणवते आहे. पूर्वी या विभागात ७० कर्मचारी होते ते आता केवळ १७ राहीले आहेत. तरी देखील अधिकारी, पदाधिकारी या विभागाकडे लक्ष देण्यास तयार नाही. या कारणाने शहरातील चौका – चौकांमध्ये दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत असून अनेक भागात अतिक्रमणधारकांची शिरजोरी वाढते आहे.

तत्कालीन उपायुक्त संतोष वाहुळे जळगाव महानगरपालिकेत असतांना शहरातील अतिक्रमणावर त्यांनी वेळोवेळी कारवाई केली होती. कारण त्यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही होता. असे असले तरी त्यांनी हा विभाग सक्षम ठेवला होता. त्यांनी अतिक्रमण विभागात २० – २५ नव्हे तर ७० कर्मचार्‍यांची फौज तयार करून ठेवली होती. जी एका आवाजावर अतिक्रमणे काढत असत. यामुळे अतिक्रमण धारकांमध्येही भीतीचे वातावरण होतेच. या उलट आत्ताची परिस्थिती दिसते. त्याकाळी कितीही मोठा अतिक्रमणधारक असो, कितीही मोठं अतिक्रमण असो त्याची हय – गय झाली नव्हती. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेले दिसते.

शहरातील सुभाष चौक, गणेश कॉलनी, अजिंठा चौफुली, बसस्टँड परिसर, स्वातंत्र चौक, फुले मार्केट, नेहरू चौक, स्टेशन रोड परिसर, नेरी नाका, गोलानी मार्केट, चित्रा चौक, नटवर चौक, बहिणाबाई गार्डन जवळील महेश चौक, आकाशवाणी चौक, एम.जे कॉलेज जवळील परिसर या भागात अतिक्रमण दिवसे – दिवस वाढतांना दिसतात. यावर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई तरी काय करणार ?, अस्थाव्यस्त झालेली शहरातील पार्किंग व्यवस्था, ठीक-ठिकाणी थांबा नसतानाही अनधिकृत पणे रिक्षा चालकांनी स्वतः बनविलेले स्टॉप. यामुळे महिला, लहान मुलं, वयोवृद्ध आणि रोज बाजार करण्यासाठी येणार्‍यांना होणार त्रास सोडविण्यास कोणीही तयार नाही.

यासाठी महत्वाचा असलेला हा विभाग सशक्त करणे गरजेचं आहे. पण एकीकडे कर्मचार्‍यांच्या अपूर्णतेमुळे होणार्‍या या त्रासाकडे अधिकारी लक्ष देत नाही तर पदाधिकार्‍यांना शासनदरबारी असलेली आकृती बंधाची फाईल मंजूर करून आणण्यात नव्हे तर जळगावात बसून एकमेकांचे उणे – दुणे काढण्यात स्वारस्य वाटते. हेच कारण अतिक्रमण धारकांना फावले असून ठिकठिकाणी अतिक्रमण वाढीस हे वातावरण पोषक ठरत आहे.