मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे. तर रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांची घोषणा अद्याप झालेली नाही. महायुती व महाविकास आघाडी जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर करत ‘आघाडी’ घेतली आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या ११ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
रावेर – शमिभा पाटील
सिंधखेड राजा – सविता मुंडे
वाशीम – मेघा डोंगरे
धामणगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
नागपूर साऊथ वेस्ट – विनय भांगे
डॉ. आविनाश नन्हे – साकोली
फारुख अहमद – दक्षिण नांदेड
शिवा नरांगळे -लोहा
विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद पूर्व (छत्रपती संभाजीनगर)
किसन चव्हाण – शेवगाव
संग्राम माने – खानापूर
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, वेगवेगळ्या ओबीसी संघटना आणि त्याचबरोबर आदिवासी समुहातील राजकीय पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणुकीत उतरवण्याचे ठरवले आहे. या आघाडीला अजून आम्ही नाव दिलेलं नाही, पुढे नाव देणार आहोत. काही जणांशी आम्ही बोलतोय, सोबतच काही संघटनांशी बोलतोय . लोकसभा निवडणुकीत आम्ही पाहिलं आहे, पैशाचा महापूर होता. आता महापुराचा महापूर येईल विधानसभेत असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करतोय. रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, साकोली, लोहा, औरंगाबाद, शेवगाव, अनापूर ही पहिली यादी जाहीर करतो, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.