धुळे : राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा बनावटीचे मद्य वाहनासह जप्त केले. यात साडेतेरा लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. परंतु , मद्यसाठा देणारा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मध्ये प्रदेशच्या सीमेलगत भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालत होते. दरम्यान, पथकाला शिरपूर तालुक्यातील वाडी अर्थे (बु) रस्त्यावर इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ मद्यसाठाची चोरटी वाहतूक होत असल्याची खबर मिळाली. यावरुन रविवार, ८ रोजी पथकाने सापळा रचला. पथकाने संशयित वाहन (एमएच १२ एक्स १४८१) थांबवून त्याची तपासणी केली. यात वाहनामध्ये स्टिक ताडपत्रीच्या खाली झाकलेले गोवा निर्मित रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीचे ११२ बॉक्ससह सीलबंद बाटल्या, असा विदेशी मद्यसाठा आढळून आला.
यावेळी पथकाने विदेशी वाहन, मद्यसाठासह पिकअप एकूण १२ लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चालक अभिजित कमलाकर जाधव व राजेंद्र नाना बिराडे (दोघे रा. बोराडी, ता. शिरपूर) या दोघांना ताब्यात घेतले. मात्र, मद्यसाठा देणारा संशयित कमलेश सुभाष पाटील (रा. बोराडी, ता. शिरपूर) हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे. या दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास निरीक्षक देविदास पाटील करीत आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई शिरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल, दुय्यम निरीक्षक बी. एस. चोथवे, पी. एस. धाईजे, एस. ए. चव्हाण, जवान केतन जाधव, गोरख पाटील, प्रशांत बोरसे, वानचालक रवींद्र देसले, एन. डी. मोरे यांच्या पथकाने केली आहे.