नंदुरबार : महाराष्ट्र राज्य सरकारने वितरण व्यवस्थेतील गळती रोखण्य आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत, राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या शिधापत्रिकेवरील प्रत्येक कुटुंब सदस्याची ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानांमार्फत ई-पॉस मशीनद्वारे ई-केवायसी (ई-लाभार्थी प्रमाणिकरण) प्रक्रिया चालू आहे. जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील एकूण 12,45,595 लाभार्थ्यांपैकी 8,29,478 लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली आहे.
ई-केवायसी प्रणालीची मदत, अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांची पारदर्शकता आणि प्रामाणिकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे. या प्रक्रियेच्या पूर्णतेनंतर, शासनाने दिलेल्या लाभांची योग्यपणे वितरण होईल, तसेच कोणत्याही प्रकारच्या गडबड किंवा गैरवापराचे प्रमाण कमी करण्यात मदत मिळणार आहे.
ई-केवायसीची प्रक्रिया रास्तभाव दुकाने यांच्यामार्फत मोफत करण्यात येत आहे. या प्रक्रियेद्वारे, आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न करून, लाभार्थ्यांची माहिती सत्यापित केली जात आहे. यामुळे शिधापत्रिकेमध्ये नमूद असलेल्या व्यक्ती त्या त्या व्यक्तीच आहेत का, याची खात्री केली जाते.
ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांची संख्या 8 लाख 29 हजार 478 आहे. ई-केवायसी अद्याप प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची संख्या 4,लाख 16,हजार 117 आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचे टक्केवारी: 66.59% असून ई-केवायसी पूर्ण होण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 ही आहे.
जिल्ह्यातील ई-केवायसीची प्रगती :
अक्कलकुवा: 69.48% अक्राणी: 56.31%, नंदुरबार: 68.56%, नवापूर: 69.37%, शहादा: 63.34%, तळोदा: 73.20%
जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी आवाहन केले आहे की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत प्रलंबित लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, त्यांनी आपल्या संबंधित रास्तभाव दुकानदार कडून प्रक्रिया पूर्ण झाल्याची खात्री करून घ्यावी.