Video : जळगावमध्ये दारू पिऊन पोलिसांचा धिंगाणा, दुचाकी पाडल्या, सायकलस्वार मुलाला धडक

जळगाव : बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाल्याची घटना रविवार, २५ रोजी भास्कर मार्केट परिसरात घडली. त्यानंतर कार काढताना दोन दुचाकींना धक्का देत त्या पाडल्या व काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले. सुदैवाने यात मुलाला मोठी दुखापत झाली नाही. दरम्यान, याविषयी अधिक माहिती घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

शहरातील भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये चार ते पाच पोलिस कर्मचारी रविवार, २५ रोजी सायंकाळी ६ वाजता  आले. ते गणवेशातच होते व वर जॅकेट घातले होते. सुरुवातीला मद्यपान केल्यानंतर ते निघून गेले. मात्र, काही वेळाने परत तेथे आले व पुन्हा मद्यपान केले. बारमध्ये बसलेले असतानाच तेथे दोन ग्लास त्यांनी फोडले. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजेदरम्यान बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद झाले. हा वाद वाढतच जाऊन तिघे जण एकमेकांना भिडले व चांगलीच पकडापकडी झाली. त्यात एक जण तर चिखलातही पडला.

हे कर्मचारी कारमध्ये (क्र.एमएच ०२, ईएच १०४८) बसले व ती काढत असताना दोन दुचाकींना धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. या कारवर पोलिसांचा लोगो आहे. त्यानंतर कशीबशी कार काढली व रस्त्याला लागल्यानंतर समोर एका सायकलस्वार मुलाला धडक दिली. त्यात तो मुलगा खाली पडला तरीदेखील न थांबता कारचालक भरधाव वेगाने पसार झाला. हा सर्व प्रकार बारसह आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, जळगाव शहरात रविवार, २५ रोजी केंद्र सरकारचे ‘लखपती दीदी’ संमेलन पार पडले. या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी हे पोलिस आल्याचे व ते जिल्ह्यातीलच असल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती घेतली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. त्यामुळे या पोलिसांवर काय कारवाई होते ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.