Vidgaon-Kolnhavi Tapi Bridge : धानोरा येथून जवळच असलेल्या विदगाव-येथून कोळन्हावी तापी पुलाचे दोन्हीकडील कठड्यांना भगदाड पडले आहे. यामुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभिर्याने दखल घेण्याची मागणी त्रस्त नागरिक आणि वाहनधारकांकडून होत आहे.
हा तापी पूल तीन तालुके तसेच एका जिल्ह्याला जोडला आहे. या पुलाकडे का दुर्लक्ष करण्यात येत आहे? या पुलावरुन किती नागरिकांचा जीव गेला आहे. तरी रस्ते दुरुस्तीच्या अनेक डेडलाईन दिलेल्या असल्या तरी अतिशय धोकादायक झालेला आहे.
तापी पुलावरून तीन तालुक्यांच्या सीमेवरचा तापी नदीला जोडणारा पूल आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना तब्बल १० ते १५ फुट जीवघेणे कठडे पूर्णपणे पडलेले आहेत. अनेक महिने लोटूनही या भागात सार्वजनिक बांधकाम खात्याने ढुंकूनही पाहिलेले नाही. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी देऊनही त्यांना दाद मिळालेली नाही. या मार्गावरुन एसटीबरोबरच स्कूलबस, खासगी गाड्या आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तसेच रस्ता खड्ड्यांनी भरल्यामुळे चुकूनही कुणाचा तोल गेला, तर तापी नदीत जाण्याची दाट शक्यता आहे.
हा रस्ता या नव्या डेडलाईनमध्ये तरी सुधारावा, अशी माफक अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तसेच अपघातसदृश स्थिती निर्माण होत असून, अनेकदा वाहनदेखील नादुरुस्त होत आहेत. तापी नदी पुलावर दोन्ही बाजूकडून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेकदा वाहन नादुरुस्त होत असल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे.
ठेकेदाराचेही होतेय दुर्लक्ष
हा रस्ता ज्यांच्याकडे हस्तांतरित झालेला आहे, त्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा सर्व प्रकार घडत असल्याचे वाहनधारकांकडून बोलले जात आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन येथील रस्त्यावरील डागडुजी व दोन्ही बाजूंचे कठडे दुरूस्त करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. याच रस्त्यावरून अधिकारी, पदाधिकारी, मंत्री आदी ये-जा करतात. तेव्हा त्यांनी तरी दखल घ्यावी व संबंधित बाधकाम विभागाच्या ठेकेदाराने पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.