भाजप नेत्या विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही जबाबदारी पार पडली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत.
सरकारकडून राहटकर यांंना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली असून, तीन वर्ष एवढा त्यांच्या पदाचा कार्यकाळ असणार आहे.दरम्यान यापूर्वी त्यांनी हाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केलं आहे. तसेच त्या भाजपच्या राजस्थानच्या सहप्रभारी आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना आता केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा दर्जा असणार आहे.
कोण आहेत विजय रहाटकर ?
विजया रहाटकर या छपत्रपती संभाजीनगरच्या महापौर होत्या. आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी शहरात अनेक विकास काम केली. त्यांच्या कार्यकाळात शहरात आरोग्य सुविधेपासून ते भौतिक सुविधेपर्यंत अनेक महत्त्वाची कामं मार्गी लागली. महाराष्ट्र भाजप युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे.
भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच त्यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाली होती. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून विजयाताईंनी “सक्षमा”, “प्रज्ज्वला”, “सुहिता” यांसारखे महिला केंद्रित कितीतरी उपक्रम राबविले. “सक्षमा” उपक्रमा मधून ऍसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. त्या सध्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट संस्थेच्या सल्लागार संचालिकादेखील आहेत.