जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेतून प्राचार्य गटातून प्राचार्य डॉ. संजय सुराणा हे ४५ मते प्राप्त करून निवडून आले. तर अध्यापक गटातून प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, व्यवस्थापन प्रतिनिधींमधून नंदकुमार बेंडाळे व भरत गावित, पदवीधर गटातून अमोल पाटील व नितीन झाल्टे हे बिनविरोध निवडून आले.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि. १६ मार्च रोजी अधिसभेची बैठक घेण्यात आली. प्राचार्यांमधून व्यवस्थापन परिषदेवर दोन प्रतिनिधी निवडून द्यावयाचे असतात. अनुसूचित जातीच्या प्रर्वगातील प्राचार्याचे अधिसभेवरील पद रिक्त आहे. खुल्या प्रर्वगात एका जागेसाठी प्राचार्य किशोर पाटील (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनगीर) आणि प्राचार्य संजय सुराणा (आर. सी. पटेल इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी, शिरपूर) यांच्यात निवडणूक झाली. प्राचार्य पाटील यांनी सुराणा यांना निवडून देण्याचे आवाहन करत आपण माघार घेत असल्याचे सांगितले मात्र माघारीची मुदत यापूर्वीच संपली असल्यामुळे निवडणूक घेणे अपरिहार्य ठरले. ५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ५१ मते वैध ठरली तर दोन मते अवैध ठरली. प्राचार्य किशोर पाटील यांना ६ मते तर प्राचार्य संजय सुराणा यांना ४५ मते प्राप्त झाल्यामुळे प्राचार्य संजय सुराणा यांना विजयी घोषित करण्यात आले.
अधिसभेच्या अध्यापकांमधून व्यवस्थापन परिषदेसाठी दोन जागा आहेत. विमुक्त जाती /भटक्या जमाती संवर्गातील एका जागेसाठी प्रा. सुरेखा पालवे (मु. जे. महाविद्यालय, जळगाव) यांचा एकमेव अर्ज प्राप्त होता त्यामुळे त्यांना तर खुल्या संवर्गातून प्रा. शिवाजी पाटील (कै. आण्णासाहेब आर. डी. देवरे महाविद्यालय, म्हसदी) यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे या दोघांना बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. व्यवस्थापन प्रतिनिधींमधून खुल्या संवर्गातील नंदकुमार बेंडाळे (केसीई संस्था, जळगाव) आणि अनुसूचित जमाती संवर्गातून भरत गावित (विसरवाडी शिक्षणसंस्था, विसरवाडी) या दोघांचेच अर्ज असल्यामुळे त्यांनाही बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. नोंदणीकृत पदवीधर सदस्यांतून व्यवस्थापन परिषदेसाठी दोन जागा निवडुन दिल्या जातात. खुल्या संवर्गातून अमोल पाटील (भडगाव) यांचा व इतर मागासवर्ग संवर्गातून नितीन झाल्टे (जामनेर) यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे हे दोघे बिनविरोध निवडून आले. निवडणुक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी निकाल घोषित केला.
अधिसभेतून व्यवस्थापन प्रतिनिधींमधून विद्यापरिषदेवर डॉ. दीपिका चौधरी, (कुसूंबा, जि. धुळे) यांचे नामनिर्देशन करण्यात आले. स्थायी समितीवर अध्यापकांमधून प्रा. अजय पाटील (कबचौ उमवि, जळगाव) यांचे नामनिर्देशन तर पदवीधरांमधून अमोल मराठे (शिंदखेडा, जि. धुळे) यांचे आणि प्राचार्यांमधून के.बी. पाटील (सोनगीर) यांचे नामनिर्देशन करण्यात आले. तक्रार निवारण समितीवर अध्यापकांमधून प्रा. गजानन पाटील (शिरपूर) यांचे, अध्यापकेतर कर्मचार्यांमधून सुरेखा पाटील (कबचौ उमवि, जळगाव) यांचे नामनिर्देशन करण्यात आले. अधिसभेच्या या बैठकीत प्रश्नोत्तराच्या तासात अधिसभा सदस्य स्वप्नाली महाजन, डॉ. जयवंत मगर, प्रा. दिनेश खरात, डॉ. दीपिका चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दीपक दलाल, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी उत्तरे दिली. सिनेट सदस्यांची पहिली बैठक असल्यामुळे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते सर्व सदस्यांना विद्यापीठ कायद्याची पुस्तिका देवून स्वागत करण्यात आले. या बैठकीला प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्यासह ६० सदस्य उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले.
सदस्यांचा सत्कार
विजयी बहुतांश सदस्य हे विद्यापीठ विकास मंचचे असल्यामुळे यावेळीही विकास मंचने आपले वर्चस्व राखले आहे. या सदस्यांचा राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन सदस्य राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.