Jalgaon State Children’s drama Competition : विळखा’ ने वाजला राज्य बालनाट्य स्पर्धेचा बिगुल

Jalgaon State Children’s drama Competition : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवार (दि.१५) रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. भुसावळ येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी विद्यालयाने सादर केलेल्या ‘विळखा’या नाटकाने या स्पर्धेचा बिगुल वाजला.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून  आमदार  सुरेश भोळे, नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्य गीतांजली ठाकरे, भुसावळ येथील ज्येष्ठ रंगकर्मी धर्मराज देवकर, डॉ. मुकुंद करंबळेकर, चंद्रकांत तायडे आदी उपस्थित होते. विनोद उबाळे लिखित आणि सोनाली वासकर दिग्दर्शीत विळखा या नाटकाचे सादरीकरण करून व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलतांना आ. सुरेश भोळे म्हणाले की, राजकारणात जर कोणी चुकीचं वागल तर तो, सहज ‘माझ्याशी नाटक करतो का’? असे म्हणतो. हा एक शब्द मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे कलावंत इतके जीव ओतून काम करतात. प्रॅक्टिकली काही कथा, काही इतिहास तर काही कुठे तरी काही तरी घडलेल्या घटनांवर  लिहितात, त्यावर सराव करतात. नाटक बघणे जितके सोपे आहे… तितकेच नाटक करणे कठीण आहे. तरी देखील समाज त्याला त्या दृष्टीने पाहतो. याला समाज म्हणून आपण कुठे तरी कमी पडतोय का? असा प्रश्न उपस्थित करत नाटक कलाकार यांच्या भावना आपण समजून घेत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी नाटकाला प्राथमिकता दिली जाते. विचार केला जातो. गर्दी होत असते. ग्रामीण भागात मात्र, सिनेमांना जास्त प्रसिद्धी दिली जाते. नाटक पाहताना ते सर्व नकली आहे, असं वाटतं. परंतु, हे नाटक करताना जीव ओतून काम करणाऱ्या कलाकाराला आपण कमी लेखतो का? कमी पडतो का? हा विचार समाजाने मंथन करण्यासारखा असल्याचेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी धर्मराज देवकर, डॉ. मुकुंद करंबडेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

विळखा 

भुसावळ येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी विद्यालयाने मोबाईल आणि इंटरनेटच्या ‘विळख्यात’ अडकलेल्या मुलांच्या जीवनावर आधारित नाटीका सादर केली. आई – वडिलांच्या व्यस्त दिनचर्येमुळे नाटकातील नायिका ‘मायरा’ हिला मोबाईचे व्यसन लागते आणि त्यामुळे तीचे मानसिक संतुलन बिघडते. ती स्वतःला आणि कुटुंबियांना विसरते. परंतू शेवटी तीच्या जीवलग मैत्रिणींच्या प्रयत्नानेच तीची गेलेली स्मृती परत येते. मुलांना मोबाईल गेम्स पेक्षा जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळले पाहिजे, एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, विविध छंद जोपासले पाहिजे असा संदेश या नाटीकेतून देण्यात आला आहे.

ज्योतीची सावित्री

धुळे एज्युकेशन सोसायटीच्या रा. के. चितळे माध्यमिक विद्यालयाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा परिचय बालकांना व्हावा, यासाठी ज्योतीची सावित्री या एकांकिकाचे सादरीकरण केले. स्त्री शिक्षणाचा पाया किती खडतर होता, समाजाकडून त्यांना किती त्रास झाला, त्यातून त्या कशा मार्गक्रमण करीत गेल्या. त्यांचा संपूर्ण जीवन परिचय या एकांकिकेत दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

विद्या विनयेन शोभते

जळगावच्या आर. आर. विद्यालयाने विद्या विनयेन शोभते या नाटीकेचे सादरीकरण केले. आयुष्य जगताना माणसाला बऱ्याच प्रसंगांना सामोरे जावे लागते. प्रसंगाच्या परिणाम स्वरूप माणूस घडत असतो. माणूस म्हटल्यानंतर त्याच्या जीवन प्रवासात ज्ञान, समृद्धी, यश, पैसा या सगळ्यांचा समावेश होतोच, पण यातील नेमकं कोणाला किती महत्व द्यावं यातील फरक आपणास कळायला हवा, नाहीतर अभिमानाची जागा अहंकार कधी घेतो हे कळायच्या आत माणसाच्या अधोगतीस सुरुवात होते. आपल्याला जर यात समतोल राखायचा असेल तर आपल्या अंगी नम्रता हवी. कारण माणसाच्या अंगी नम्रता असेल तर त्यातील सर्वच गुण शोभून दिसतात. त्याच्या ज्ञानास अधिक झळाळी प्राप्त होवून जीवन समृद्ध बनत, असा संदेश यात देण्यात आला आहे.

गांधी व्हायचंय आम्हाला

सहलीला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर हे नाटक आधारित असून यातून अहिंसेचा संदेश देण्यात आला आहे.

सोनू आणि मोनू या गुंडांच्या तावडीत सापडलेल्या मित्रांना सोडविण्यासाठी गुंडांना एकटाच पकडून त्यांना धडा शिकविण्याच्या गोष्टी करणाऱ्या बंड्याला चमत्कारीपणे महात्मा गांधी म्हणजेच बापू गुप्त भेट देतात आणि त्याला मारामारी न करता युक्तीने गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची ते सांगतात. बापू त्याला सांगतात की तुम्ही सर्व जण मिळून एकत्रपणे अहिंसेच्या मार्गाने या संकटातून बाहेर पडू शकता. सध्या जगात माणसांमध्ये व्याप्त हिंसेच्या प्रवृत्तीमुळे होणारे नुकसान आणि त्यावर एकमेव उपाय म्हणून अहिंसा आणि प्रेम ह्यांचे महत्व देखील बापू त्याला समजावतात. शेवटी सर्व मुले अजिबात मारामारी न करता गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतात. असे या नाटीकेत दाखविण्यात आले आहे.

 

कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज या नाटकांचे सादरीकरण

सकाळी १० वाजता फुलपाखरु, सकाळी ११.१५ वाजता राक्षस, दुपारी १२.३० वाजता कॉपी बहाद्दर, दुपारी १.४५ वाजता परी, दुपारी ३ वाजता गुंडाळलेली स्वप्न, दुपारी ४.१५ वाजता सुपर पॉवर, सायंकाळी ५.३० वाजता ढगाळ लागली कड, या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.