---Advertisement---
अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ गावात स्वस्त धान्य दुकानाच्या कामकाजावरून वाद निर्माण झाला असून, गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नर्मदा महिला बचत गटामार्फत चालवण्यात येणाऱ्या या दुकानाविरोधात ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. संबंधित दुकानदाराचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या दुकानात नियमानुसार धान्य वाटप केले जात नाही. अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काप्रमाणे पूर्ण धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याशिवाय, वितरित करण्यात आलेल्या धान्याच्या पावत्या देखील दिल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भागातील बहुतांश नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने, अशा प्रकारामुळे त्यांच्या अडचणीत अधिक भर पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी संबंधितांकडे विचारणा केल्यावर काही नागरिकांना धमकावण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, सध्याच्या दुकानदाराचा परवाना रद्द करून तो प्रामाणिक व पात्र बचत गटाला देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.









