विनेश फोगाटला 16 कोटींहून अधिक बक्षीस? पती सोमवीर राठी यांनी सांगितली हकीकत

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला. पहिल्यांदाच भारतीय कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचला होता. फायनलमध्ये विनेशकडून सुवर्ण जिंकण्याची अपेक्षा होती, पण त्याआधीच अनपेक्षित घडले. अंतिम सामन्याच्या दिवशी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेशला अपात्र घोषित करण्यात आले.

विनेश फोगटने या निर्णयाविरुद्ध कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये अपील केले आणि तिला एकत्रित रौप्य पदक देण्याची मागणी केली. मात्र, सीएएसने स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचे अपील फेटाळून लावले होते. विनेशला पदक जिंकता आले नाही, पण मायदेशी परतल्यावर चॅम्पियनप्रमाणे तिचे स्वागत झाले. विनेश 17 ऑगस्ट रोजी पॅरिसहून घरी परतली. विनेश दिल्लीहून तिच्या मूळ गावी बलालीला गेली आहे. बलालीला जाताना त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

पॅरिस ऑलिम्पिकमधील चमकदार कामगिरीमुळे विनेश फोगाट सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. विनेशबाबत एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की या भारतीय कुस्तीपटूला विविध संस्थांकडून बक्षीस म्हणून सुमारे 16.35 कोटी रुपये मिळाले आहेत. ही पोस्ट सुभाष फौजी नावाच्या युजरने शेअर केली आहे.

आता विनेश फोगाटचे पती सोमवीर राठी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सोमवीरने त्याच्या X खात्यावर लिहिले की, विनेश फोगाटला खालील संस्था, व्यापारी, कंपन्या आणि पक्षांकडून एकही पैसा मिळालेला नाही. तुम्ही सर्व आमचे हितचिंतक आहात, कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. यामुळे आपले नक्कीच नुकसान होईल. सामाजिक मूल्यांचीही हानी होईल. स्वस्त लोकप्रियता मिळविण्याचे हे एक साधन आहे.

हरियाणा सरकारकडून 4 कोटी
हरियाणा सरकारने आधीच सांगितले होते की, विनेश फोगटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, सरकार ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला जे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा देते ते विनेश फोगटलाही कृतज्ञतेने दिले जातील. हरियाणा सरकारच्या क्रीडा धोरणानुसार रौप्यपदक विजेत्याला ४ कोटी रुपये मिळतात, म्हणजेच विनेशलाही ही रक्कम मिळणे आवश्यक आहे.