भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कांबळी यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे.
शनिवारीच कांबळीची प्रकृती खूपच खालावली होती. त्याच दिवशी त्यांना तातडीने ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा झालेली नाही.
अलीकडेच कांबळीने विकी लालवानीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या तब्येतीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, ‘मला लघवीशी संबंधित समस्या येत होत्या. मी चक्कर येऊन पडलो होतो. माझा मुलगा येशूने मला उचलले आणि माझ्या पायावर उभे केले. माझी मुलगी आणि माझी पत्नी मदतीसाठी पुढे आली. डॉक्टरांनी मला ॲडमिट व्हायला सांगितले होते. तेव्हा सचिन तेडुंलकरने माझ्यावरील शस्त्रक्रियेचा खर्च केला होता.
विनोद कांबळीने १९९१ मध्ये भारतीय संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने १९९३ मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. तो भारतासाठी सर्वात जलद १००० कसोटी धावा करणारा फलंदाज होता. त्याने १४ डावात ही कामगिरी केली होती. पण, नंतर तो दिश भरकटला आणि क्रिकेटमधून त्याचे लक्ष विचलित झाले. त्याने १७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १०८४ धावा केल्या आहेत आणि त्यामध्ये ४ शतकं व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने टीम इंडियासाठी १०४ वन डे सामन्यांमध्ये एकूण २४७७ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि १४ अर्धशतकं आहेत.
कांबळीची दोन लग्ने, दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले
कांबळीने शेवटचे 2019 मध्ये संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते, तो T20 मुंबई लीगशी संबंधित होता. मुंबईत जन्मलेल्या कांबळीने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याचे वडील मेकॅनिक होते. त्याने दोनदा लग्न केले. 1998 मध्ये त्यांनी पहिले लग्न नोएला लुईसशी केले.
नोएला पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट होती. हे प्रेम जीवन फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कांबळीने 2006 मध्ये मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न केले. कांबळीला एक मुलगा येशू क्रिस्टियानो आणि एक मुलगी आहे.