जळगावात वाहतूक नियमांचे उल्लंघन, १२५ जणांवर कारवाई

तरुण भारत लाईव्ह । १३ जानेवारी २०२३ । शासन निर्देशानुसार जिल्ह्यात ११ ते १७ जानेवारी दरम्यान रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार शहर परिसरात ठिकठिकाणी जनप्रबोधन करण्यात येत असून वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या १२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रस्ते सुरक्षा सप्ताह २०२३ अंतर्गत पोलीस प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात आली. यात वर्दळीच्या ठिकाणी वाहन चालविताना मोबाइल वर बोलणे, अतिवेगाने वाहन चालविणे, वा रस्त्याच्या परिस्थितीचे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे झालेल्या अपघाताचे प्रात्यक्षिकाद्वारे जनजागृती करण्यात आली.

यावेळी वाहनचालविताना सीटबेल्टचा वापर,हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे टाळावे,अतिवेगाने वा मद्यपान करून वाहन चालवू नये आदी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सिग्नल लाल असताना ओलांडणे, अतिवेगाने वाहन चालविणे,कर्णकर्कश हॉर्न, यश अन्य वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी १२५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे हे पोलीस प्रश्नाचे ध्येय नसून वाहनचालकांनी सावधानतेने व रस्ते सुरक्षिततेचे नियमांचे पालन केल्यास होणारे अपघात टाळणे शक्य होईल, तसेच मानवी जीवन सुरक्षित रहावे, असा उद्देश आहे असे पोलीस निरीक्षक,शहर वाहतूक लीलाधर कानडे यांनी सांगितले.