हिंसाग्रस्त मणिपूरमध्ये घुसखोरांचा सुळसुळाट! खोट्या कागदपत्राद्वारे परदेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

इंफाळ : मागच्या एक वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि दोन गटात तणावाचे वातावरण आहे. त्यातचं आता बनावट आधार आणि मतदार ओळखपत्र बनवून परदेशी घुसखोरांना भारतात आश्रय देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांचे विशेष पथक त्यांचा माग काढत असून, अलीकडेच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी चुराचंदपूर येथून म्यानमारमधील दोन अवैध घुसखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन बनावट ओळखपत्रे सापडली. अशा अनेक प्रकरणांचा पोलीस तपास करत आहेत. हे आरोपी घुसखोरांना दस्तऐवजात पत्ता म्हणून कोणत्या ठिकाणाचा उल्लेख करायचा ते सांगतात. अशाप्रकारे घुसखोरी होणे केवळ मणिपूरसाठीच नाही तर संपूर्ण देशाला धोका असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

म्यानमारमध्ये हुकूमशाही लष्कर आणि लोकशाही समर्थकांमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराला कंटाळून अनेक जण भारतात पोहोचले आहेत. त्यांचे बायोमेट्रिक्स मणिपूरमध्ये नोंदवले गेले आहेत. त्यांचे बायोमेट्रिक्स रेकॉर्ड होऊ नये म्हणून ते बनावट आधार आणि मतदार ओळखपत्र बनवणाऱ्या टोळ्यांशी संपर्क साधतात. २०१८ मध्ये सीमेवर असलेल्या जिराबाम आणि मोरे जिल्ह्यातून अशा दोन टोळ्या पकडल्या गेल्या होत्या.

अटक करण्यात आलेल्या १० आरोपींपैकी ९ म्यानमारमधील मुस्लिम घुसखोर होते. तमिळनाडूतील परीथा बेगम नावाच्या महिलेलाही अटक करण्यात आली आहे. मोरे येथील मोहम्मद टोंबा याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी २ लॅपटॉप, ४ आधारकार्ड, एक प्रिंटर मशीन, एक लॅमिनेटिंग फिल्म मशीन, प्लास्टिक शीट, अनेक डीव्हीडी आणि फोटो पेपर जप्त केले आहेत.