जळगाव : शहर विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदानाच्या अवघ्या एक दिवस अगोदर शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकीने राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून, राजीनामा देण्याचे कारणदेखील प्रसार माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले आहे.
शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिवसेना शिंदे पक्षात मंगळवारी प्रवेश केला आहे. विष्णू भंगाळे यांच्या निवासस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे, भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे, शिवसेनेचे सरिता माळी कोल्हे, गणेश सोनवणे, राहुल नेतलेकर, आदी उपस्थित होते.
विष्णू भंगाळे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे पालकमंत्री ना. पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले, तसेच भंगाळे यांच्या येण्याने शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
विष्णू भंगाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका मांडतांना सांगितले की, परंतु, आज सकाळी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी मला छेडताना असं सांगितलं की, तुम्ही काम करत नाहीये असं नाहीये तसं नाहीये. म्हणजे उद्या काही घटना घडली उद्या लोकसभेप्रमाणे जागा गेली तर माझ्या नावाने खापर पडणार आहेत. या पदावर काम करत असताना ते सर्व अधिकार ते स्वतःकडे ठेवतील आणि खापर माझ्या नावाने फोडतील. तर अस असेल तर म्हटलं मी राजीनामा देऊन जातो. मी त्यांना बरोबर 11- 11:30 वाजता राजीनामा देतोय असे सांगून त्याप्रमाणे मी राजीनामा दिलेला आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ना. गुलाबराव पाटील असतील आणि आमच्या सर्व नेते असतील उदय सावंत असतील भाऊसाहेब असतील यांच्याशी बोलणं झाल्यानंतर नेतृत्वाच्या माध्यमातून सरिता माळी कोल्हे असतील किंवा सर्व जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी असतील त्यांच्याशी हितगुज केल्यानंतर मी राजीनामा दिला आहे.
त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट शंका निर्माण केली की तुम्ही जळगावत काम करत नाहीये. मी काम करतोय माझ्या माध्यमातून मी सर्वांना संपर्क करतो. व्यापारीवर्ग , विद्यापीठात संपर्क साधला आहे. ते माझ्यावर शंका घेत असतील आणि आरोप लावत असतील की मी काम करत नाहीये मग कशासाठी आपण त्यांच्यासोबत काम करावं उलट जिथे न्याय मिळत असेल तिथे समाधानी राहावं. कोणत्या पदासाठी याच्यासाठी गेलेलो नाही आणि जात नाही. परंतु, प्रामाणिकपणाने काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्या मोठ्या सख्ख्या भावाचं बायपास आहे झालं कालपासून माझा परिवार पुण्याला होता आणि मी इथं जी शेवटची रॅली आहे म्हणून मी जळगावला थांबलो. शिवसेनेच्या रॅलीसाठी थांबल्याचे हे फळ मला मिळाले. ते सांगा की तू काम करत नाही. आजचा हा निर्णय हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मला पक्षाने त्या पक्षाने खूप काही दिलेला आहे. परंतु, येणाऱ्या काळामध्ये मला असं लक्षात आलं की आता यांच्यासोबत काम करणे योग्य नाही पण येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून महायुतीचं काम मी करत राहील.