आषाढी एकादशी ! विठोबाच्या दर्शनासाठी जळगावच्या ‘या’ तालुक्यातून विशेष बसेसची व्यवस्था

जळगाव : आगामी आषाडी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रावेर आगारातून खानापुर, चिनावल आणि इतर गावातून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रावेर आगार प्रमुख विजय पाटील यांनी दिली.

आगामी आषाडी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी, रावेर तालुक्यातील वारकऱ्यांसाठी जादा बसेसची मागणी केली होती. त्यानुसार जादा बसेस पंढरपूरला पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मस्कावद, पूनखेडा, पातोंडी, निरुड, आणि खिरोदा येथून प्रत्येकी एक बस पंढरपूरला जाणार आहे.

तसेच, खानापुर, चिनावल, रसलपुर आणि रझोदा येथून प्रत्येकी तीन बसेस बुक करण्यात आलेल्या आहेत. या बसेस ठरलेल्या वेळेनुसार पंढरपूरकडे रवाना होणार आहे.

येत्या काही दिवसांत लांब पल्याच्या बसेस रद्द करून पंढरपूरला दररोज विशेष बसेस पाठवण्यात येणार आहेत. यामुळे वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अधिक सोयीचे आणि सुलभ प्रवास होईल, अशी माहिती रावेर आगार प्रमुख विजय पाटील यांनी पत्रकारांना दिली.