TRAI Rules : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) एअरटेल, बीएसएनएल, जिओ, आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना 2G नेटवर्कवर डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी परवडणाऱ्या व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस प्लॅन्स सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या बाजारात उपलब्ध रिचार्ज प्लॅन्समध्ये डेटा पॅकचा समावेश असल्याने जुने फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक खर्च येतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी TRAI ने कंपन्यांना स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, जे केवळ व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएससाठी असतील.
TRAI चे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, “डेटा वापराला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे, परंतु ग्राहकांवर तो लादला जाऊ नये. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा निवडता यावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
रिचार्ज प्लॅन्सची वैधता 365 दिवसांपर्यंत
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रिचार्ज व्हाउचर्सची वैधता 90 दिवसांवरून 365 दिवसांपर्यंत वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन पर्याय मिळतील. ₹10 च्या किमान रिचार्जचा नियम मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
डिजिटल डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) पायलट प्रकल्प
TRAI ने डिजिटल डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या पूर्वपरवानगीचे डिजिटल सत्यापन करण्यासाठी पायलट प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाद्वारे ग्राहकांना वाणिज्यिक संदेशांमधून बाहेर पडण्याचा (Opt-out) पर्याय मिळणार आहे.
ग्राहकाभिमुख सेवा आणि पारदर्शकता वाढणार
TRAI च्या या निर्णयामुळे जुने फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात सेवा मिळतील. कमी खर्चात चांगल्या सुविधा देण्याच्या या प्रयत्नामुळे ग्राहकांचा विश्वास दृढ होईल, तर टेलिकॉम कंपन्यांना अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल.