भाजपला मत, मोदींच्या गळाभेटेची मागणी; मौलाना साजिद रशीदी यांचे मोठ विधान

#image_title

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील तीन प्रमुख पक्ष आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसच्या नशिबाचा निर्णय EVM मध्ये लॉक झाला आहे. पण त्याआधी ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशीदी यांनी भाजपबाबत मोठ विधान केलं आहे. दिल्ली मध्ये झालेल्या विधानसभेत त्यांनी आपलं मतदान भाजपला केलं असल्याचं मौलाना साजिद रशीदी यांनी जाहीर केलं. मी माझ्या आयुष्यात भाजपला पहिल्यांदा मतदान केल्याचं मौलाना साजिद रशीदी म्हणाले. मी भाजपला मतदान करुन मुस्लिम भाजपला मतदान करत नाहीत, हा दृष्टीकोन मोडण्याचा प्रयत्न केलाय, असं ते म्हणाले.

“मला मोदींजीची एकदा गळाभेट घ्यायची आहे. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांची गळाभेट घेतली होती, तशी मला त्यांची गळाभेट हवी आहे. मोदीजींनी मलाही मिठी मारावी अशी माझी इच्छा आहे. भाजपने सुद्धा सच्चा मुस्लिमांचा स्वीकार करावा” असं मौलाना साजिद रशीदी म्हणाले.

भाजप आमच्यासाठी अस्पृश्य नाहीय

“मी हे सांगत नाहीय की, एकजूट होऊन मतदान करा. पण मला हे म्हणायचं आहे की, आपण ते परसेप्शन तोडू ज्यात असा समज आहे की, मुस्लिम भाजपला हरवण्यासाठी मतदान करतात. भाजप आमच्यासाठी अस्पृश्य नाहीय. काँग्रेस, समाजवादी पार्टीचे आम्ही मजूर नाही” असं मौलाना साजिद रशीदी म्हणाले.

काँग्रेसने आमच्यासाठी काय केलं?

“केजरीवालांनी दिल्ली दंगलीसंदर्भात मुस्लिमांसाठी काय केलं?. काँग्रेसने आमच्यासाठी काय केलं? दिल्ली दंगली दरम्यान राहुल गांधी मुस्तफाबादला गेले. पण ताहिर हुसैनच्या घरी गेले नाहीत. केजरीवालांनी तबलिगी जमातला टार्गेट केलं. कोविड दरम्यान तबलिगीला जबाबदार ठरवलं” असं मौलाना साजिद रशीदी म्हणाले.

आमची अपेक्षा असते की…

“सर्वच राजकीय पक्ष मुस्लिमांसोबत एकसारखाच व्यवहार करतात. काँग्रेसने मुस्लिमांसाठी काही जास्त केलय असं नाहीय. ज्यावेळी आम्ही कुठल्या पक्षाला मतदान करतो, तेव्हा आमची अपेक्षा असते की, त्या पक्षाने आमच्या अधिकाराच रक्षण करावं” असं मौलाना साजिद रशीदी म्हणाले.