सातारा : लोकसभा निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी दिसून येत आहे. सर्वच पक्षांचे नेते प्रचार सभा घेण्यात व्यस्त आहेत. भारतीय जनता पक्षाने जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आपले लक्ष महाराष्ट्रावर केंद्रीत केले आहे. याकरिता राज्यात रॅली, सभा घेण्यात येत आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यांनी सातारा लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या प्रचारासाठी शनिवारी प्रचार सभा घेतली.
याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामगिरीची माहिती देत भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोदी यांचे सरकार महिला सक्षमीकरणासाठी कार्य करत आहे. याअंतर्गत देशात 80 लाख बचत गट तयार करण्यात आले असून त्यांना 8 लाख कोटी रुपये देण्यात आले आहे. बचत गटांच्या माध्यमातून देशातील 10 कोटी महिलांना स्वावलंबी बनवले. 1 कोटी महिला लखपती दीदी झाल्या. भविष्यात आणखी 3 कोटी महिला लखपती दीदी बनवणार आहे. ते म्हणाले, ही लोकसभा निवडणूक येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बदलणारी आहे. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मतदान करा. असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.