नंदुरबार : दारूबंदीची मागणी किंवा विरोध महिलांद्वारे विविध कारणांमुळे केली जाते, त्यात आर्थिक, सामाजिक, आणि कुटुंबीय समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येते. महिलांच्या दृष्टिकोनातून, दारूबंदी लागू करणे हे कुटुंबीय स्थैर्य आणि समाजातील हिंसा कमी करण्यासाठी आवश्यक आहे. अनेक महिलांचे मत आहे की दारूच्या विक्रीने घरातील आर्थिक आणि मानसिक तणाव वाढतो, ज्यामुळे अनेकदा घरगुती हिंसा, बेरोजगारी, आणि इतर सामाजिक समस्या निर्माण होतात.
दरम्यान शहादा तालुक्यातील असलोद गावातून दारूबंदी संदर्भातील अशीच माहिती समोर आली आहे. गावातील दारूबंदी करण्यासाठी गावात महिलांनी चक्क मतदान घेण्याचा निर्णय घेताला आहे. गावकरी आणि सामाजिक संघटना तसेच महिलांनी दारूबंदीसाठी लढा उभारला होता. प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी आज सकाळी आठ वाजता महिलांचे मतदान सुरू झाले. सकाळपासूनच मतदानासाठी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून यात आडवी बाटली जिंकते की उभी याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद या गावात सर्रासपणे दारू विक्री केली जात आहे. या दारूच्या नशेत तरुण मुले देखील राहत असल्याने गावात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून करण्यात आली होती. मात्र यावर निर्णय होत नसल्याने अखेर गावातील महिला व सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदी करण्यासाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आज गावात मतदान प्रक्रिया राबविली जात असून या प्रक्रियेत गावातील १२६० महिला मतदार दारूबंदीसाठी मतदान करणार असल्याची माहिती तहसीलदार गिरासे यांनी दिली.
गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना मिळालेली गावकऱ्यांची साथ, यामुळे गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान होत आहे. अखेर महिला जिंकतात की गावातील अवैध व्यवसाय करणारे, हे मतदानाच्या वेळेस समजणार आहे. मात्र या मतदान प्रक्रियेचं जिल्ह्यातून कौतुक केलं जात आहे.