तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । पाचोरा तालुक्याती वाडी (शेवाळे) येथे पुतण्याचा बैल शेतात शिरल्याचा राग येवुन काकाने पुतण्यास तर चुलत काकाने चुलत पुतण्यास काठीने डोक्यात वार केल्याने ४३ वर्षीय पुतण्या हा गंभीर झाल्यानंतर त्यांना जळगांव येथे गोदावरी हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर बुधवारी त्याचेवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली, या आरोपींना गुरुवारी पाचोरा न्यायालयात हजर करण्यात आले असता एकास एक दिवसाची पोलीस कोठडी तर एकास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांकडुन प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वाडी (शेवाळे) येथील प्रल्हाद मोतीराम भोसले व त्याचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेत जमिन शेजारी असल्याने पुनमचंद भावराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात शिरल्याचा राग येवुन प्रल्हाद भोसले याने त्याच्या नात्याने लागणारा नातु किरण पुनमचंद भोसले यांच्या पाठीत काठीने वार केला. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले याने पुनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. यामुळे पुनमचंद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जळगांव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.
दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी शेतात बैल शिरल्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याने किरण पुनमचंद भोसले याने चुलत आजोबा प्रल्हाद मोतीराम भोसले व गणेश भोसले यांचे विरुध्द २७ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये कलम 326 नुसार गुन्हा दाखल केल्याने सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपुत यांनी वाडी येथे जावुन गणेश भोसले यास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गणेश भोसले १ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान किरण भोसले याचे वडिल पुनमचंद भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुनमचंद भोसले यांचा मृत्यू झाल्याने सदर गुन्ह्यातील आरोपी प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांचेवर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे या आरोपींना गुरुवारी पाचोरा न्यायालयात हजर केले असता आरोपी प्रल्हाद भोसले यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर आरोपी गणेश भोसले यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या आरोपीची जळगाव सब्जेल्ला रवानगी करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करित असून गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.