पुणे : अभिनेता सैफ अली खानवर खरंच चाकू हल्ला झाला की, तो ॲक्टिंग करून बाहेर आला? असा संशय मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. बुधवार, २३ जानेवारी रोजी आळंदी येथे हिंदू महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, “मुंबईत बांग्लादेशी काय करत आहेत? ते सैफ अली खानच्या घरात घुसले. आधी फक्त नाक्यावर उभे राहायचे आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ अली खान असा चालत होता की, खरंच चाकू मारला की, ॲक्टिंग करून बाहेर आला, असा मलाच संशय आला. जेव्हा कुठल्याही ‘खान’ला त्रास होत असेल तेव्हा सगळेच बोलतात. पण कुठलाही हिंदू कलाकार असो किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर मुंब्राचे जितुद्दीन आणि बारामतीच्या ताई बाहेर आल्या नाहीत. त्यांना सैफ अली खान आणि शाहरुख खानचा मुलगा आणि नवाब मलिक यांचीच चिंता आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
…तर हिंदू महोत्सव आयोजित करण्याची गरज पडणार नाही!
मंत्री नितेश राणे म्हणाले की, “आपल्या या हिंदू राष्ट्रात एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून काहीही उपयोग होणार नाही. ज्यावेळी ३६५ दिवस आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण अभिमानाने हिंदू म्हणून जगू त्यावेळी असा महोत्सव आयोजित करण्याची काहीही गरज पडणार नाही. आपल्याच हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला आपल्या धर्मस्थळांसाठी लढावे लागते. त्या धर्मस्थळावर कुणीतरी अतिक्रमण करण्याची, आपल्या देवीदेवतांवर दगड मारण्याची आणि आपल्या हिंदू माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करतो. ही हिंमत कुठल्याही इस्लाम राष्ट्रात झाली असती का? याचा विचार करायला हवा.”
“आपल्या प्रमुख धर्मस्थळांवर वक्फ बोर्डाने दावा करण्यास सुरुवात केली आहे. महाकुंभाची जागा वक्फ बोर्डाची आहे, अशी बोलण्याची हिंमत या हिरव्या सापांनी केली आहे. उद्या आपल्या आळंदीकडेसुद्धा वाकड्या नजरेने पाहतील. पण केवळ डोक्यात भगवी टोपी आणि गळ्यात भगवा मफलर घालून आपण स्वत:ला हिंदू म्हणवतो.”
“मी सरकारचा प्रतिनिधी असेल, मंत्री असेल आमदार असेल पण या सगळ्याआधी मी एक हिंदू आहे. माझ्या धर्माकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास सगळी पदे बाजूला गेली तरी चालतील. माझ्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला मी जागेवर ठेवणार नाही ही शपथ घेऊनच आज हा प्रवास सुरु आहे. आपला देश हिंदू राष्ट्र आहे आणि इथे आधी हिंदूंचेच हित बघितले जाणार आहे. राज्यात आज हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले आहे. हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवले आहे. त्यामुळे हिंदू समाजाचे आणि हिंदू माता-भगिनींचे संरक्षण करणे हे आमचे परम कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
राज्यात सर्वात सक्षम धर्मांतरविरोधी कायदा आणणार!
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रत्येक गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण साफ करण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. तसेच आमच्याच सरकारच्या काळात आम्ही देशातील सर्वात सक्षम धर्मांतरविरोधी कायदा आणून दाखवू. या राज्यात गौमातेच्या संरक्षणासाठी एकही कत्तलखाना आम्ही ठेवणार नाही,” असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले.