तरुण भारत लाईव्ह न्यूज । राहुल शिरसाळे । सरासरीच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस होऊनही टंचाईच्या झळा आतापासून जाणवू लागला आहेत. जिल्ह्यातील चार गावांना आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवावी लागत आहे.
गत पावसाळ्यात प्रारंभीच्या कालखंडात म्हणजे जून महिन्यात जेमतेम पाऊस झाला. परिणामी बळीराजा हवालदिल झाला होता. त्यानंतर मात्र दमदार पावसाला सुरुवात झाली. अगदी पावसाळा संपला तरी पाऊस सुरूच होता. अनेक तालुक्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही आता मात्र टंचाई जाणवू लागली आहे. वरून सूर्यदेव आग ओकत आहेत दुसरीकडे भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन होऊन जलस्त्रोत आटत आहेत. काही गावांच्या जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने गावातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. परिणामी पाणी योजना किंवा टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी वाढते आहे.
चार गावांना टँकरने पाणी
जिल्ह्यात चार गावांना आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यात प्रामुख्याने मोरगाव ता. जामनेर, तळबंदतांडा ता. भडगाव, ऐणगाव, ता. बोदवड, हनुमंतखेडा, ता. पारोळा या चार गावांना टँकरने पाणीपुरवठा करून गावाची तहान भागविली जात आहे. यासह मौजे तातगाव भिल्ल वस्ती, ता. चाळीसगाव व मौजे लोणवाडी बुद्रूक, ता. जळगाव येथे तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. यासह १० गावात खासगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. टंचाई आराखड्यानुसार भविष्यात योजना राबविल्या जातील, असे जिल्हा प्रशासनाकडील सूत्रांनी सांगितले.
टंचाई आराखडा दुसऱ्यांदा सादर
पाणी टंचाईची स्वरूप लक्षात घेऊन दरवर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील गावांना पाणीपुरवठ्याचे नियोजन केले. यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाला सादर केला जात असतो. टंचाई आराखड्याच्या आधारावर तातडीची मदत राज्य शासनाकडून मिळते. यंदा हा आराखडा सादर केल्यानंतर त्यात सुधारणांच्या सूचना मिळाल्या. त्यानुसार दोन वेळा हा आराखडा तयार करून जि.प.मार्फत सादर करण्यात आला आहे.