---Advertisement---

Jalgaon News : पाणीटंचाईच्या जाणवताय झळा, ‘या’ दोन तालुक्यात टँकरने होतोय पाणीपुरवठा

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून नव्हे, तर फेब्रुवारीपासूनच तापमान सरासरी ३५ ते ४० अंशादरम्यान होते. सद्यस्थितीत तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशादरम्यान असून २५ ते ३० दिवसात तापमानाने बरीच मजल गाठली आहे. यामुळे बाष्पीभवन प्रक्रियादेखील वेगाने होत आहे. वाढते तापमान पाहता जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेच्या झळांचा तडाखा बसत आहे.

महिनाभरात प्रकल्पीय साठ्यात तब्बल साडेआठ टक्के घट झाली असून सरासरी ०.८ टक्के घट दरदिवशी होत असल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे एप्रिलच्या तिसऱ्या सप्ताहात पाणीटंचाईने डोके वर काढले असून सर्वप्रथम अमळनेर तालुक्यात दोन, तर भडगाव तालुक्यात एका गावासाठी टँकरची मागणी आल्यानुसार टँकर सुरू करण्यात आले आहेत.

पेयजल आणि सिंचनासाठी गिरणेचे सात आवर्तन

जिल्ह्यात २०२४च्या मॉन्सूनमध्ये सप्टेंबरमध्येच पावसाने सरासरी गाठली होती. त्यामुळे सर्वच लहान-मोठे प्रकल्प ओसंडून प्रवाहित झाले होते. तसेच नोव्हेंबर-डिसेंबरअखेर सर्वच नदी-नाल्यांमधील जलप्रवाह सुरू होते. दरम्यान, जिल्हास्तरीय कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गिरणा प्रकल्पातून सिंचन आणि पेयजल असे सात आवर्तन देण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर हतनूर प्रकल्पातूनदेखील सिंचनासह पेयजलासाठी आतापर्यंत तीन आवर्तन देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत फक्त गिरणा डावा कालव्याद्वारे १०० क्यूसेकचे आवर्तन सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

घट बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात

गिरणा प्रकल्पातून आतापर्यंत सिंचनासह तीन पेयजलाचे आवर्तन देण्यात आले असून सरासरी दीड ते दोन हजार क्यूसेकनुसार सलग, अखंडपणे डिसेंबर ते मार्चपर्यंत आवर्तन सुरू होते. त्यामुळे झपाट्याने गिरणा प्रकल्पाच्या उपयुक्त जलसाठ्यात घट झाली. या आवर्तनासोबतच कालव्याद्वारे मिळणाऱ्या आवर्तनातून होणारी पाणीचोरी, फुटलेल्या, नादुरुस्त पाटचाऱ्यांमधून पाणीगळती आणि वाढत्या तापमानामुळे होणारा बाष्पीभवनाचा वेगदेखील बराच असल्याने उपयुक्त पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली आहे.

मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या जलसाठ्याची टक्केवारी मन्याड ३२.११, बोरी १३.५९, भोकरबारी ३.०८, सुकी ७९.१६, अभोरा ७२.९५, अग्नावती-तोंडापूर मंगरूळ मोर गूळ २४.४२, ३०.२४, हिवरा २९.७३, ४८.९३, बहुळा ३३.८८. ७०,०८, अंजनी ३४.३३. ६७.५४, शेळगाव बॅरेज २२.९४ असा जिल्ह्यातील तीन मोठे, १४ मध्यम आणि ९६ लघु प्रकल्पीय साठा एकूण सरासरी २२.४० टीएमसी अर्थात ४१.२४ टक्के जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

अन्य तालुक्यांमध्ये पाणीटंचाई आटोक्यात असून जाणवत नसली तरी पाणीटंचाई निवारणार्थ जामनेर तालुक्यात ५ गावांसाठी ५ विहिरी, चाळीसगाव ४ गावे ४ विहिरी, पाचोरा ३ गावे ३ विहिरी, एरंडोल, अमळनेर आणि पारोळा तालुक्यात प्रत्येकी १ गाव १ विहीर, अशा १५ गावांसाठी १५ विहिरी अधीग्रहित करण्यात आल्या आहेत.

टँकरद्वारे पाणीपुरवठा

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबरपूर्वीच संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु सरासरीपेक्षा दीडपट पर्जन्यमानामुळे या वर्षी मार्चअखेरपर्यंत जिल्हा टँकरमुक्त होता. एप्रिलच्या तिसऱ्या सप्ताहात खासदार स्मिता वाघ यांच्या डांगर बुद्रुक गावाला दोन, तर भडगाव तालुक्यात तळबंद तांडा या गावात एक टँकरद्वारे मागणीनुसार एका टँकरद्वारे, असा तीन टँकरद्वारे सद्यस्थितीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

सप्ताहाच्या सुरुवातीसच अमळनेर आणि भडगाव तालुक्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा मागणीचे प्रस्ताव आले होते. यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरून तसेच स्थानिक स्तरावरून गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त पाहणीनुसार अमळनेर आणि भडगाव तालुक्यांना पाणीपुरवठ्यासाठी टँकर मागणीनुसार सुरू करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment