पाणी पुरवठ्याच्या 200 कामांना ठेकेदार मिळेना!

 

तरुण भारत  लाइव्ह न्यूज़ जळगाव : जिल्ह्यात     जीवन मिशन अंतर्गत 1 हजार 478 पाणी योजनांच्या कामांची प्रक्रिया राबविण्याचे कामकाज सध्या सुरू आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या या योजनांपैकी 200 योजनांच्या कामांची टेंडर प्रक्रिया चार वेळा रिकॉल करण्यात आली आहे. मात्र तरीही या पाणी योजनांच्या कामांचे मक्तेदार टेंडर भरत नसल्याची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी योजनांच्या टेंडर प्रक्रियेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत 200 पाणी योजनांचे टेंडर वारंवार प्रसिध्द केले जात आहे. मात्र कंत्राटदार ही कामे करण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येते. पाणी पुरवठा योजनेचे काम करणारे कंत्राटदार कमी आहेत. यापूर्वी जिल्ह्यात वर्षभरात 20 ते 25 योजना राबविल्या जात होत्या. मात्र जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात पाणी योजना राबविण्यासाठी गती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील टेंडर प्रक्रियेत अडकलेल्या 200 पाणी योजनांचा विषय मार्गी लावण्यासाठी जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी नुकतीच कंत्राटदारांची बैठक घेतली. त्यात त्यांनी कंत्रांटदारांच्या अडचणी आणि योजनांची स्थिती याबाबतची माहिती जाणून घेतली. वर्कऑर्डर झालेल्या पाणी योजनांचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना सीईओंनी बैठकीत दिल्या.