तीन हजार 300 चिमुकले ‘पालकांच्या कुशीत’

आपल्यापेक्षा लहान भावंडांवर आई-वडीलांचे अधिक असलेले प्रेम, परीक्षेत नापास झाल्याने मारण्याच्या भीतीने, घरातील पालकांची भांडणे, वडिलांचे व्यसन त्याचबरोबर कोवळ्या वयात झालेले प्रेमप्रकरण व मुंबईतील चंदेरी दुनियाची ओढ, चुकीची संगत आदी कारणांमुळे अल्पवयीन मुले घरे सोडतात मात्र या वाट चुकलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्याचे अव्याहत कार्य जळगावच्या केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाकडून सुमारे सात वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या पाच वर्षात समतोल प्रकल्पाने तब्बत तीन हजार 300 मुला-मुलींना आपल्या पालकांच्या कुशीत सुखरूप पोहोचवले आहे. कुणीही अनाथ नाही व अनाथ राहणार नाही याचा प्रत्यय जळगावसह भुसावळातील सात सदस्यांची टिम अहोरात्र आपल्या कार्यातून देत आहे.

पाच वर्षात 3300 हरवलेले स्वगृही सुखरूप परतली

माहिती व तंत्रज्ञानाच्या आधूनिक युगात पालकांच्या दिवसेंदिवस मुलांकडून अपेक्षा वाढतच आहेत. त्यातच कडक वागणुकीमुळे सुरक्षित वातावरण शोधण्यासाठी मुले घरातून अनेकदा पळ काढतात शिवाय कोवळ्या वयात झालेले प्रेम, चुकीची संगत तसेच चंदेरी दुनियेची ओढ यासह विविध कारणांमुळे चिमुकले घराबाहेर पडतात. लाखो प्रवाशांच्या गर्दीत आपला शोध लागणार नाही, शिवाय सोबतीला दोन पैसे नसल्याने लाखो प्रवाशांच्या गर्दीत आपण पकडले जाणार नाही याचा विश्वास चिमुकल्यांना असल्याने शक्यतो ते रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात, असा आजवरचा अनुभव आहे. असे असलेतरी समतोल प्रकल्पाने गेल्या पाच वर्षात अशाच पद्धत्तीने देशाच्या कानाकोपर्‍यातून घर सोडलेल्या 17 वर्षाखालील तब्बल तीन हजार तीनशे बालकांचा शोध घेत त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.

भुकलेल्यांना मिळतोय आधार

हरवलेल्या, संतापात घर सोडलेल्या तसेच घराबाहेर पडलेल्या बालकांना शोधून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचव्याचे दिव्य कार्य समतोल करीत असताना गरजूंच्या वेळोवेळी जेवणाचीही व्यवस्था केली जाते. तस्करी संशयातून भुसावळात उतरवण्यात आलेल्या चिमुकल्यांच्याही जेवणाची अलीकडचे प्रकल्पाने व्यवस्था केली होती हेदेखील विशेष

पालकांनी जागरुक होण्याची आवश्यकता

माहिती-तंत्रज्ञानाच्या बदल्यात युगात पालक आपल्या मुलांकडून दिवसागणिक अपेक्षा वाढवत आहेत त्यामुळे मुलांपेक्षा पालकांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. घरात मिळणारे कडक वा सापत्न वागणूक यामुळे सुरक्षित वातावरण शोधण्यासाठी मुले घरातून पळ काढतात त्यामुळे पालकांनी पाल्यांमधील बदलाकडे लक्ष दिले पाहिजे तसेच शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून आपल्या पाल्याची माहिती घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता लक्षात घेवून त्यांच्याकडून अपेक्षा करणे गरजेचे आहे.

असे चालते ‘समतोल’ प्रकल्पाचे चे काम

केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर 2015 वर्षात समतोल प्रकल्पाला सुरूवात झाली. जळगावसह भुसावळातील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर प्रकल्पाचे कार्यालय आहे. समतोल प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप पाटील असून भुसावळसाठी महेंद्र चौधरी, दीपक पाचपांडे, प्रशांत चौधरी व प्रतिभा महाजन तर जळगावसाठी विश्वजीत सपकाळे व रवीना भगत काम पाहतात. भुसावळसह जळगाव रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर संबंधित सदस्य प्रत्येक डब्याची बारकाईने पाहणी करतात व संशयास्पद स्थितीत मुले आढळल्यानंतर त्यांची मायेने चौकशी करतात व नंतर खरा प्रकार समोर आल्यानंतर पालकांच्या स्वाधीन या बालकांना केले जाते व ज्यांचे पालक नसतील त्यांना जळगाव बालगृहात हलवण्यात येते.

वाट भरकटलेल्यांना ‘समतोल’चा आधार

पअल्पवयीन बालकांसह अल्पवयीन मुलीही विविध कारणातून संतापाच्या भरात घर सोडतात. अशा चिमुकल्यांचा समतोलचे सदस्य दिवसभरात रेल्वे स्थानकासह परीसरात व रेल्वे गाड्यांना शोध घेतात शिवाय सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर चिमुकल्यांचा शोध घेवून त्यांच्या पालकांचा शोध घेवून सदस्य त्यांच्यापर्यंत त्यांना पोहोचवतात व निराधार बालकांना मात्र जळगावातील बालगृहात हलवले जाते शिवाय भूकेल्यांना जेवणही प्रकल्पाच्या माध्यमातून दिले जाते, असे समतोल प्रकल्पप्रमुख राहुल पवार म्हणाले. आतापर्यंत गेल्या पाच वर्षात तीन हजार तीनशे बालकांना स्वगृही सुरक्षितरीत्या पोहोचवण्यात आले आहे शिवाय बालकांचे समुपदेशनही करण्यात येत असल्याचे पवार म्हणाले.

रेल्वे सुरक्षा यंत्रणांचे लाभते सहकार्य

समतोल प्रकल्पाला रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग व प्रवाशांसह रेल्वे कर्मचार्‍यांकडून ही माहिती दिली जाते. त्यानंतर संबंधित ट्रेनमध्ये सदस्य जावून माहितीची खातरजमा करतात व पुढील कारवाई करतात. जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या मुस्कान अभियानाला समतोलचे सदस्य नेहमीच सहकार्य करीत आले आहेत. 24 तास प्रकल्पाचे सदस्य दोन शिप्टमध्ये कार्यरत असतात शिवाय भुकलेल्यांना अन्नाची व्यवस्थाही प्रकल्पामार्फत केली जाते. प्रकल्पातील सदस्यांना संपर्क साधण्यासाठी जळगावसाठी 8956183987 तर भुसावळसाठी 8956183988 हा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात आढळली 52 बालके

समतोलच्या माहितीनुसार जुलै 2023 महिन्यात भुसावळसह जळगाव रेल्वे स्थानकावर तब्बल 52 बालके घर सोडून आल्याचे आढळले. प्रकल्पातील सदस्यांनी सात बालकांच्या पालकांचा शोध घेत त्यांना पालकांच्या स्वाधीन केले तर अन्य बालकांना बालगृहात दाखल करण्यात आले. एकूण बालकांमध्ये 43 मुले तर नऊ मुलींचाही समावेश होता.