सुरक्षेसाठी आत्मनिर्भर व्हावेच लागेल, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

---Advertisement---

 

देशात गेल्या काही दिवसांत एक वेगळेच वातावरण होते. पहलगामच्या घटनेचा बदला घ्यावा अशी समाजातील प्रत्येकाची भावना होती. ही देशाची इच्छा होती. त्यानंतर भारतीय सेनेची वीरता आणि क्षमता दिसली. सेनेला आदेश देणान्या शासन प्रशासनाचीही दृढता आम्ही पहिली . केवळ एवढ करून हि स्थिती बदलणार नाही, तर आपल्याला आपली सुरक्षा करण्यासाठी स्वनिर्भर व्हावेच लागेल. असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

नागपुरात ‘कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय’चा समारोप आज रेशीमबाग मैदानावर झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम उपस्थित होते. व्यासपीठावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, प्रमुख पाहुणे अरविंद नेताम, विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, सर्वाधिकारी समीरकुमार मोहंती उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून अमेरिकेतून आलेले बिल शुस्टर, बॉब शुस्टर, ब्रेडफोर्ट एलिसन, वॉल्टर रसेल मिड आणि बिल ड्रेक्सेल उपस्थित होते. सरसंघचालक पुढे म्हणाले, आता युद्धाचे प्रकार बदलले आहेत.

थेट समोरासमोर युद्ध न करता ‘प्रॉक्सी वॉर केले जाते. आता झालेल्या युद्धानंतर सर्व राजकीय पक्ष एकत्र आले. हे एक उत्तम चित्र आहे. उत्तम लोकशाहीचे हे उत्तम उदाहरण आहे. जोपर्यंत द्विराष्ट्रवाद आहे, तोपर्यंत मात्र असे प्रकार संपणार नाहीत. या युद्धानंतर कोण आपला आहे आणि कोण विरोधक आहे. हे स्पष्ट झालं आहे. सुरक्षेसाठी विविध प्रयोग केले जातात. ते केलेच पाहिजे. पण केवळ तेवढ्याने होणार नाही.

त्यात समाजाची साथ असणे आवश्यक आहे. देशहितासमोर काहीच महत्त्वाचे नसते. आपण आपसात स‌द्भावनेचा व्यवहार ठेवला पाहिजे. सध्या भडकविणारे लोक समोर आले आहेत. ‘व्हिक्टिम हुड’ करणारे लोक आहेत. त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. गेत्या ९८ वर्षांपासून नागपुरात हे वर्ग सुरू आहेत. त्यात समाजाला मदत करणारे स्वयंसेवक तयार केले जातात. संघाचे काम पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. ते हळूहळू समाजात मुरते. जसा पाण्याचा थेंब जमिनीत मुरतो आणि जमिनीतील बी रुजून पीक तयार होते, त्याप्रमाणेच संघाची काम करण्याची पद्धत असल्याचे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.

आपले मूळ एकतेतच

आपला देश जरी विविधतेने नटलेला असला तरी आपले मूळ एकतेतच आहे. आपली भाषा, धर्म, पूजा पद्धती, राहणीमान जरी वेगवेगळे असले तरी आपण एकोप्याने राहिले पाहिजे. कारण आपण सारे एकच आहेत. जगातील पूर्ण मानवजात एक आहे. असे विविधतेला स्वीकारून एकतेत राहणे भारतालाच जगासोमर ठेवावे लागेल .

आदिवासी हा आमचाच समाज

आदिवासींची सध्या खूप वाईट स्थिती आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला संघाने मदत करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांनी त्यांच्या भाषणात केली. त्यावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, आदिवासी हा आमचाच समाज आहे. संपूर्ण हिंदू समाजाला संघ एकच मानतो. या समाजाच्या उद्धारासाठी संघ निश्चितच मदत करेल. संघ सर्वांना सोबत घेऊन काम करतो. याआधीपासूनच आदिवासी समाजासाठी संघाचे काम सुरू आहे. आताही संघ मदत करायला तपार आहे. आम्ही समाजाच्या बळावर काम करतो. ज्यांच्यासाठी काम करायचे आहे. त्यांना सोबत घेऊनच काम करू.

आम्हाला मदत करा: अरविंद नेताम

आदिवासी समाजासमोर सध्या दोन समस्या आहेत धर्मांतरण आणि नक्षलवाद. या दोन समस्या सोडविण्यासाठी संघाने आदिवासी समाजाला मदत करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांनी भाषणातून केली. ते म्हणाले की, बस्तरमध्ये आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण सुरू आहे. त्यापासून त्यांना वाचविले पाहिजे. यासाठी धर्मकोड तयार करण्याची मागणी त्यांनी केली. आदिवासी समाजाची ओळख कायम राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचे ते म्हणाले, तर नक्षलवादावर आता नियंत्रण आले आहे. पण तो पूर्णपणे संपला पाहिजे. नक्षलवादाने पुन्हा डोके वर काढू नये यासाठी ठोस उपाय करणे गरजेचे आहे. आदिवासी समाज नक्षलवादाकडे वळू नये यासाठी त्यांना मदत करण्याची मागणी नेताम यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---