“आम्हाला महाविकास आघाडीची मतं…”; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : आम्हाला महायूतीची मतं मिळालीच, शिवाय महाविकास आघाडीचीही मतं आम्हाला मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणूकीत महायूतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आलेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महायूतीचे नऊचे नऊ उमेदवार निवडणून आल्याने अत्यंत आनंदाचा क्षण आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही महायूतीचे ९ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेक लोक आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, अशी वल्गना करत होते. पण आज आम्हाला आमची मतं तर मिळालीच, शिवाय महाविकास आघाडीची मतंदेखील आमच्याकडे आली आहेत. त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झाला आहे. आमचे निवडून आलेले उमेदवार सर्व समाजातले आणि सामान्य लोकांमध्ये काम करणारे आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “सदाभाऊ खोत हा जनतेचा आणि शेतकऱ्यांचा नेता आहे. त्यामुळे महायूतीच्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाच. त्यासोबतच इतरही आमदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. ही सुरुवात झालेली असून विधानसभेतदेखील मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायूती निवडून येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.