आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : आपल्याला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. याकरिता विकासाची वज्रमूठ बांधावी लागेल. ही निवडणूक विचारांची नसून विकासाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या काळातील घटना दुरुस्तीबाबत विरोधक बोलत असतात. विरोधकांकडून अनावश्यक मुद्दे उचलले जात आहेत. यास काही अर्थ नाही. इंदिरा गांधींकडून २८ वेळा घटना दुरुस्ती केली आहे. तर मोदींकडून सहा वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. घटना दुरुस्ती आणि बदल समजून घ्या असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते मावळ लोकसभेत आयोजित केलेल्या महायुतीची समन्वय बैठकीत बोलत होते.

भूलथापांना बळी पडू नका
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका. परत म्हणाल दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसलं काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, महायुतीचा धर्म पाळायला हवा. मैत्री, नातं-गोतं, भावकी-रावकी बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे अशी पदाधिकाऱ्यांना आठवण करून दिली. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की, अजित दादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. असं अजिबात नाही. अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका,असेही अजित पवार म्हणाले. १४० कोटींमध्ये ७० कोटी महिला आहेत. आता प्रत्येक महिलांच्या खात्यात १ लाख टाकायची गॅरंटी द्या म्हणतात. आता मला सांगा असं केलं तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.