जळगाव : जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तीन-चार दिवसांवर येवून ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर भिका दराडे यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शनिवारी जळगाव जिल्ह्यात होते. जळगाव शहरातील आदित्य लॉनमध्ये सायंकाळी आयोजित या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विविध संघटनांचे पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला.
मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, आई-वडिलांनंतर शिक्षकाचे स्थान हे आदराचे स्थान आहे. शिक्षक भावी पिढी घडवितो. शिक्षक विद्यादानाचे काम करतो तेव्हा त्याच्याही काही अपेक्षा असतात. शिक्षकांच्या समस्या सोडविणे हे शासन कर्त्यांचे काम असते. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावू. यासोबत शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी मेळाव्यात केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ, जळगाव शहरचे आमदार सुरेश दामू भोळे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याच्या आमदार लता
सोनवणे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नीलेश पाटील, उज्वला बेंडाळे, अमोल चिमणराव पाटील, अमोल जावळे, सतीश महाले, करीम सालार, विविध संस्थांचे संस्थाचालक उपस्थित होते.