आम्ही नाही सांगणार जा…!’

नागेश दाचेवार २८ पक्षांनी स्थापलेल्या ‘भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी’चा (भाराविसआ) पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? आम्ही नाही सांगणार जा…, भाराविस आघाडीच्या १५ तासांच्या बैठकीसाठी कोट्यवधींचा खर्च कोणी केला? आम्ही नाही सांगणार जा…, कोणता मुद्दा घेऊन तुम्ही निवडणूक लढणार? आम्ही नाही सांगणार जा. पंतप्रधान मोदींचा सामना करण्याची तुमची रणनीती काय? आम्ही नाही सांगणार जा…, पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचाराला जाणार का?

आम्ही नाही सांगणार जा…, बरं तो किमान समान कार्यक्रम काय आहे?  आम्ही नाही सांगणार जा… यांना काहीच सांगायचं नव्हतं, पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळ काढायचा होता, तर मग पत्रकार परिषद घेतलीच कशासाठी असावी यांनी? आपलंच तुणतुणं वाजवून पळ काढणा-यांना बेस्ट, चाणक्य वगैरे नाही तर पळपुटे म्हणतात. भाराविस आघाडीच्या बैठकीच्या पृष्ठभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी हिंदी पत्रकारांचे प्रश्न अडचणीचे ठरत असल्याचे लक्षात येताच ते टाळले आणि उद्धव ठाकरे, शरद पवारांनी हातवारे करून गप्प बसण्याचे इशारे पत्रकारांना केले.

शिवाय त्याला बोलू दे म्हणत, अडचणीचे प्रश्न विचारणा-यांना प्रश्न विचारण्यापासून मज्जाव करण्याचा प्रकार यावेळी करण्यात आला. तर, पहिले मराठीतून होऊ देत, नंतर हिंदीमध्ये घेऊ असे सांगून, मराठीचे काही प्रश्न घेतले. त्यालाही समर्पक उत्तरं दिली नाहीत आणि पत्रकार परिषद अक्षरशः गुंडाळली. एकदा शरद पवारांनी दिल्लीतही वृत्तवाहिनीच्या पत्रकारासोबत अशीच वर्तणूक केली होती. संजय राऊतांनीदेखील आम्ही तुमच्या वृत्तवाहिनीवर बहिष्कार घालू, अशा शब्दात एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला धमकावले होते.आता कालपरवा पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी असाच काहीसा प्रकार पत्रकारांसोबत केला. मुळात कोणतेही वैचारिक अधिष्ठान नसले आणि अस्तित्व वाचविण्यासाठी खोट्याचं खरं करू पाहणा-यांना जेव्हा प्रश्न अडचणीचे ठरतात, अशावेळी तोंडचं पाणी पळालेली ही खोटारडी नेतेमंडळी असा उर्मटपणा दाखवून तेथून पळ काढून स्वत:ची सुटका करून घेतात.पण ही सुटका तात्पुरती असते,

जनतेसमोरून पळ काढणे सोपं नाही. जनता तुमच्या साèया गोष्टींचा हिशोब वेळ आली की करत असते. कोणत्याही प्रश्नाला ‘आम्ही नाही सांगणार जा…’ असे म्हणून चालणार नाही. पत्रकारांसोबत भलेही तुम्ही उर्मटपणे वागाल, पण जनतेला उत्तरे द्यावीच लागतील आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणूनच पत्रकार जनतेच्या वतीने, त्यांच्या मनातले प्रश्न विचारतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाही आणि टोलवाटोलवी केली, उर्मटपणे वागले तर… हे सगळं जनता बघत असते. तुमच्याकडे उत्तरं नाही म्हणून तुम्ही पळालात, उलटी उत्तरं दिली, उर्मटपणे वागलात हे जनतेला कळत नाही अशातला भाग नाही. जनतेला आणि पत्रकार दोघांनाही कळते. पण पत्रकारांना तुम्ही त्यावेळी तात्पुरते गप्प करता आणि जनता प्रश्न विचारायला तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.

त्यामुळे याचे उत्तर अशा उर्मट राजकारण्यांना मतपेटीतून देत असते. ते येणा-या २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीत यांना मिळेल, यात शंका नाही. भारत जुड चुका है, इंडिया विश्व जित चुका है। भाजपा सूडबुद्धीने काम करीत आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या कारवाईने देशातील जनता कंटाळली आहे, आता मोदींना धडा शिकवायचा असल्याचा डांगोरा मोदी विरोधी पक्षाचे नेते पिटताना दिसतात.