---Advertisement---
weather update : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात अनपेक्षित बदल जाणवत असून थंडीच्या तीव्रतेला अचानक विश्रांती मिळाली आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात एका दिवसातच मोठी वाढ नोंदवली गेली आहे. शनिवारी पहाटे किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअस इतके होते, मात्र रविवारी त्यात तब्बल ५.४ अंशांची वाढ होऊन तापमान १५.५ अंशांवर पोहोचले असल्याने रविवारी पहाटे थंडीचा कडाका कमी जाणवला.
नववर्षाच्या सुरुवातीपासूनच जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला किमान तापमान १० अंशांच्या आसपास होते. मात्र १ जानेवारी रोजी तापमानात घसरण होऊन ते ९.२ अंशांपर्यंत खाली आले. त्यानंतर सलग चार दिवस तापमान जवळपास स्थिर राहिले. रविवारी मात्र एका दिवसातच मोठी वाढ झाल्याने नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला.
महत्त्वाचे म्हणजे ही वाढ केवळ किमान तापमानात झाली असून कमाल तापमान मात्र स्थिर आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असतानाही असा अचानक बदल झाल्याने हवामानातील अनियमितता स्पष्टपणे दिसून येत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व राजस्थान भागात सक्रिय झालेल्या चक्रीवादळी प्रणालीमुळे महाराष्ट्रात उबदार व आर्द्र हवा प्रवेश करत आहे. त्यामुळे थंड लाटेचा प्रभाव कमी होऊन किमान तापमानात वाढ होत आहे. ही प्रणाली सध्या अधिक तीव्र होत असल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. मात्र पुढील काही दिवसांत पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात ५ ते ९ जानेवारीदरम्यान किमान तापमान ११ ते १५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ७ जानेवारीपर्यंत हलके ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.









