जळगाव : पहुर ता.जामनेर येथील बालाजी पेट्रोलियम नामक पेट्रोल पंपाच्या मशिनचे स्टॅम्पिंग करून द्यावे, यासाठी पाचोरा येथील वैधमापन निरीक्षक विवेक सोनू झरेकर यास सहा हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकार्यांनी लावलेल्या सापळ्यात मंगळवारी अटक केली आहे.
जामनेर तालुक्यातील पहुर येथे बालाजी पेट्रोलियम नावाने तक्रारदार यांचा पेट्रोल पंप आहे. त्यावरील कार्यरत असलेल्या चार झोनल मशीनचे स्टॅम्पिंग करून देण्यासाठी वैधमापन निरीक्षक विवेक सोनू झरेकर याने प्रत्येकी दीड हजार रुपये प्रति असे सहा हजार रुपये लाच मागितली. तक्रारदाराने यासंदर्भात जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पडताळणी करण्यात आली. ठरल्यानुसार मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास पहुर जळगाव रस्त्यावरील हॉटेल अजिंक्य येथे सापळा लावण्यात आला यात पाचोरा वैध मापन निरीक्षक विवेक झरेकर रा. पुनगाव रोड, पाचोरा यास सहा हजार रुपये लाच स्वीकारत असताना पंचासमक्ष अटक करण्यात आली.
ही कारवाई जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव, एन.एन.जाधव, पोलीस नाईक ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सचिन चाटे यांच्या पथकाने
केली.