ग्रामीण जनतेचा खर्च कशावर?

#image_title

अन्न हा नेहमीच भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. अवघ्या दशकभरापूर्वीपर्यंत देशातील दारिद्र्यरेषा माणसाला एका दिवसात किती कॅलरीजची गरज आहे आणि त्यासाठी किती खर्च करावा लागेल या आधारे ठरवली जात होती. यामुळेच जुन्या सर्वेक्षणातील खर्चाचे आकडे मुख्यतः अन्नावर केंद्रित होते. १९६० च्या दशकात, कुटुंबाच्या वार्षिक खर्चाच्या तीन चतुर्थांश खर्च फक्त अन्नावर होत असे. तथापि, लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसा येऊ लागला. ते अन्नावर कमी आणि इतर गोष्टींवर जास्त खर्च करू लागले. हा बदल भारतातील शहरी भागात १९९० च्या अखेरीस दिसून आला. त्या काळात लोक अन्नापेक्षा इंधन, भाडे, शिक्षण, आरोग्य, प्रवास इत्यादींवर जास्त खर्च करू लागले होतेः मात्र आता हा बदल ग्रामीण भारतातही पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच ग्रामीण भागात लोक जेवणाऐवजी इतर गोष्टींवर जास्त खर्च करू लागले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, भारतात अन्नावर होणारा खर्च आता ग्रामीण आणि शहरी लोकांच्या मासिक खर्चाच्या निम्म्याहून कमी आहे. गेल्या काही दशकांमध्ये हा वाटा झपाट्याने घसरला आहे. एका अहवालात भारतीय घरांच्या उपभोग खर्चाची तपशीलवार माहिती दिली आहे. हा अहवाल स्पष्ट करतो की, ही जगभरातील एक सामान्य प्रवृत्ती आहे. कारण लोकांचे उत्पन्न वाढते. ते शारीरिक श्रमापासून दूर जातात आणि त्यांचा अन्नावरील खर्च कमी होतो. याचा अर्थ असा की, लोक अधिक कमावू लागतात, तेव्हा ते अन्नावर कमी खर्च करतात. कारण त्यांच्याकडे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसे असतात.

उदाहरणादाखल अमेरिका आणि जर्मनीसारख्या विकसित देशांकडे पाहता येते. या देशांतील लोक त्यांच्या एकूण खचपैिकी केवळ १५ टक्के अन्नावर खर्च करतात. याचे कारण म्हणजे तेथील लोक अधिक कमावतात आणि त्यांच्याकडे अन्नाशिवाय इतर अनेक गरजांसाठी पैसा असतो. सांख्यिकी मंत्रालयाने भारतीय कुटुंबांच्या घरगुती खर्चासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार २०११-१२ च्या तुलनेत ग्रामीण भागातील मासिक खर्चातला खाण्यापिण्याचा खर्च ५३ टक्क्यांवरून ४६.४ टक्क्यांवर आला आहे. शहरी भागाबद्दल बोलायचे झाले तर या काळात अन्नधान्याचा वाटा ४२.६ टक्क्यांवरून ३९.२ टक्क्यांवर आला आहे. शहरी भागात अन्नाऐवजी अखाद्य पदार्थांचा वाटा ५७.४ टक्क्यांवरून ६०.८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ग्रामीण भागात हा वाटा ४७ टक्क्यांवरून ५३.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. लोक आता प्रवासावर जास्त खर्च करू लागले आहेत. शहरी भागात लोक दर महिन्याला वाहतुकीवर सरासरी ५५५ रुपये खर्च करतात तर ग्रामीण भारतात हा खर्च २८५ रुपये आहे. याशिवाय ग्रामीण भारत पान, तंबाखू आणि मादक पदार्थांवर जास्त खर्च करतो. २०२२-२३ मध्ये पान, तंबाखू आणि मादक पदार्थांवर दरडोई मासिक खर्च १४३ रुपये होता. १९९९-२००० मध्ये शहरी भागातील खर्चामध्ये वाहतूक खर्चाचा १०.६ टक्के हा वाटा २०२२-२३ मध्ये वाढून १४.१ टक्के झाला आहे. त्याच वेळी ग्रामीण भारतात हा वाटा आणखी वेगाने वाढला. मागील दोन दशकांमध्ये ग्रामीण भारतात सातत्याने वाढलेला खर्च टेलिव्हिजन, मोबाईल फोन, गृहोपयोगी उपकरणे इत्यादी उपभोग्य वस्तूंवर होत आहे. ग्रामीण भारत आता मनोरंजनावर पूर्वर्वीपेक्षा दुप्पट खर्च करतो.

लोक अधिक कमावू लागले, त्यांच्याकडे अन्नाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसे येत आहेत. त्यामुळे अन्नावरील खर्चाचा वाटा कमी झाला आणि लोक भाडे, शिक्षण, आरोग्य, प्रवास, मनोरंजन इत्यादी जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करू लागले. पूर्वी बहुतेक लोक हाताने काम करायचे (जसे की शेती, बांधकाम इ). त्यात शरीराला जास्त कॅलरीजची आवश्यकता असते. आता बहुतेक लोक ऑफिस किंवा मशीनवर काम करताना शारीरिक श्रम कमी करतात. त्यामुळे जास्त सकस अन्न खाऊन कॅलरी खर्च करण्याची गरज कमी झाली आहे. याचा परिणाम असा झाला की, अन्नावरील खर्च कमी झाला. लोक श्रीमंत होत गेले, तसतसा लोकांनी आपला आहार बदलला. तो फक्त भात किंवा रोटीपुरता मर्यादित राहिला नाही. आता त्यांनी फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि इतर पौष्टिक पदार्थांवर खर्च करायला सुरुवात केली आहे. हे महाग असले, तरी लोकांनी त्यांचा आहारात समावेश करण्यास सुरुवात केली आहे. भारतातील सरकारी योजनांतर्गत गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य (तांदूळ, गह इत्यादी) मिळत आहे. त्यामुळे त्यांचा अन्नावरील खर्च कमी झाला आहे. परिणामी अन्नावरील एकूण खर्चही कमी झाला आहे. शहरी भागातील लोक पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूडवर जास्त खर्च करू लागले आहेत. याशिवाय बाहेरच्या जेवणाची सवय वाढली आहे. या गोष्टी महाग असतात.

‘नॅशनल सॅम्पल सव्र्व्हे ऑफिस’ (एनएसएसओ) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भारतातील सरासरी दरडोई वापर खर्च (वस्तू आणि सेवांवर घरगुती खर्च-एमपीसीई) ३७७३ रुपये आहे. या खर्चाचा मोठा हिस्सा खाद्यपदार्थांवर जातो. २०२२-२३ च्या सर्वेक्षणानुसार, दरडोई उपभोग खर्चातील खर्च दोन प्रमुख भागांमध्ये विभागला आहे. तांदूळ, गहू, फळे, भाज्या, कपडे, शिक्षण, आरोग्य, भाडे, मनोरंजन, वाहतूक आदींचा त्यात समावेश होतो. सिक्कीममधील ग्रामीण भागात सरासरी ‘एमपीसीई’ ७,७३१ रुपये आहे आणि त्यातील एक मोठा भाग अन्नावर खर्च केला जातो. कारण सिक्कीममध्ये अन्न खर्चाचा वाटा जास्त आहे तर छत्तीसगडच्या ग्रामीण भागात, सरासरी एमपीसीई २४६६ रुपये आहे. हा खर्च इतर राज्यांपेक्षा कमी आहे. येथे अन्न खर्च तुलनेने जास्त असेल; कारण कमी उत्पन्नाच्या बाबतीत अन्नावरील खर्चाचा वाटा जास्त असतो. १९९९-२००० ते २०२२-२३ या काळात भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात दरडोई उपभोग खर्चात (एमपीसीई) लक्षणीय वाढ झाली आहे. ग्रामीण भारतातील सरासरी ‘एमपीसीई’ १९९९-२००० मध्ये ४८६ रुपये होता. तो २००४-०५ मध्ये ५७९ रुपयांपर्यंत वाढला. २००९-१० मध्ये १०५४ रुपये तर २०११-१२ मध्ये १४३० रुपये आणि २०२२-२३ मध्ये ३७७३ वर पोहोचला. याचा अर्थ गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील लोक अन्न आणि गैरखाद्य बाबींवर अधिक खर्च करू लागले आहेत.

शहरी भागातही उपभोगात वाढ दिसून आली आहे. शहरी भारताचा सरासरी ‘एमपीसीई’ १९९९-२००० मध्ये ८५५ रुपये होता. तो २००४-०५ मध्ये ११०५ रुपये, २००९-१० मध्ये १९८४ रुपये, २०११-१२ मध्ये २६३० रुपये तर २०२२-२३ मध्ये ६४५९ रुपये इतका वाढला. शहरी भागात ही वाढ ग्रामीण भागापेक्षा जास्त होती. हे दर्शवते की, शहरी लोक प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांवर जास्त खर्च करीत आहेत. चांगल्या दर्जाच्या अन्नाचा अभाव असल्याने ग्रामीण भागात फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस, अंडी आणि कडधान्ये या प्रथिनयुक्त अन्नावरील खर्च कमी असू शकतो, कारण ते महाग आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे पौष्टिकतेची कमतरता होऊ शकते; जी विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे वाढत्या वयाबरोबर मानसिक आणि शारीरिक विकासात अडथळा येतो. पौष्टिक आहार न घेतल्यास त्यांच्यामध्ये मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि पचनसंस्थेचे आजार यासारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. अशा रोगांच्या उपचारावरील खर्च वाढू शकतो आणि गरीब कुटुंबांसाठी तो अतिरिक्त भार बनू शकतो. विशेषतः मुलांमध्ये पोषणाच्या अभावामुळे शारीरिक आणि मानसिक विकासाला विलंब होतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे ते सहज आजारी पडू शकतात. शिवाय मुलांच्या शिक्षणात आणि ज्ञान संपादनातही घट होऊ शकते. त्यांच्या मानसिक विकासात पौष्टिक आहार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो