पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

#image_title

नाना पटोले आणि संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे मविआत तणाव असल्याने काँग्रेसने आता अनुभवी नेत्याला जागा वाटपाच्या चर्चेसाठी पुढे केलं, बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची भेट घेतली म्हणाले…

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतान महाविकास आघाडीत जागावाटपावरुन कुठलाही तणाव नसल्याचे सांगितले. 

संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत बिघाडी होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला सतावत होता. त्यामुळे आता मविआच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात तर शिवसेना उभाठा गटाकडून अनिल देसाई यांना पुढे करण्यात आले आहे का, असा प्रश्न थोरात यांना विचारण्यात आला असता यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमच्यापैकी कोणीतरी एक नेता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटणार होता. मात्र, रमेश चेन्नीथला यांनी मला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जायला सांगितले. शरद पवार आणि माझी चर्चा चांगली झाली. आता काही थोड्या जागांवर निर्णय बाकी आहे. यामधून लवकरच मार्ग निघेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

मविआत जागावाटपाची चर्चा सुरुच आहे. मात्र, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक पक्षाला उमेदवारीसाठी आग्रह धरण्याचा अधिकार आहे. कारण मविआतील तिन्ही पक्षांकडे चांगले उमेदवार आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षाकडून आग्रह धरला जात आहे. यामध्ये कोणताही वाद नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

बाळासाहेब थोरात घेणार उद्धव ठाकरेंची भेट

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात आता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आम्ही जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. बहुतांश जागांवर निर्णय झाला आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. दोन-तीन पक्ष एकत्र असले की अशा अडचणी येतात. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची बातमी खोटी असल्याचे थोरात म्हणाले. महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, त्यामध्ये काहीही तथ्य नाही, हे ग्रामीण भागातील साध्या व्यक्तीलाही कळेल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.