जालना : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता एक नवीन मागणी केली आहे. कुणबी नोंदी आढळलेल्या मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, जरांगेंच्या या मागणीमुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, “मुस्लीमांच्यासुद्धा सरकारी नोंदी आढळल्या आहे. जर मुस्लिमांच्या कुणबी, लिंगायत, मारवाडी, ब्राम्हण, लोहार अशा नोंदी निघाल्या तर त्यांनासुद्धा ओबीसीतूनच आरक्षण द्यायला हवं. त्यांच्यावर अन्याय व्हायला नको. जर मुस्लीमांच्या कुणबी नोंदी आढळल्या तर या राज्यातील सगळ्या मुस्लिमांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण द्या,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
जरांगेंचा अभ्यास कमी – छगन भुजबळ
मनोज जरांगेंच्या या मागणीवर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. पण मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे. २५ वर्षांपूर्वीच मुस्लीम समाजातील माळी, कासार, कुरेशी अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे. जरांगेंना उगीच काहीच माहिती नसतं. कधी मुस्लीम समाजाला, कधी धनगर समाजाला तर कधी वंजारी समाजाला खुश करण्यासाठी ते बोलतात. त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा,” असा सल्ला भुजबळांनी जरांगेंना दिला आहे.